भोरच्या शेतकऱ्याची कमाल!! आईस बर्गच्या शेतीतून केली लाखोंची कमाई 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्याच्या काळातील शेतकरी पारंपारिक शेती सोडून शेतीत नवनवे प्रयोग करत आहेत. या प्रयोगातून त्यांना मोठा नफा ही मिळत असल्याचे दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात राहणाऱ्या शेतकऱ्याने आपल्या शेतीत असाच एक प्रयोग करत नव्या शेतीला सुरुवात केली आहे, या शेतीत समीर सुकाळे यांना चांगला आर्थिक फायदा झाला आहे.  भोर येथील समीर सुकाळे या शेतकऱ्याने रेसिडू फ्री शेती करून एक्सोटीक शेतीपीकातील आईस बर्ग या भाजीची आगळी वेगळी शेती करून भरघोस उत्पन्न घेतले आहे. भोर तालुक्यात अशाप्रकारची शेती प्रथमच केली गेली आहे. कोरोनाच्या काळात ही अनेक समस्या असताना यशस्वी शेती करून इतर शेतकऱ्यांपुढे समीर सुकाळे यांनी एक आदर्श ठेवला आहे.

कामरे या गावातील शेतकरी भात हे रब्बी पीक घेतल्यानंतर आठ महिने आपली शेती पडीक ठेवतात कारण काही फुटावर पाणी असूनही शेतीला पाणी उचलण्यास मर्यादा आहेत. समीर यांनी धरणाच्या बॅक वॉटरमधून सुमारे दोन किमीची पाईप लाईन करून आपल्या शेतावर आणली आहे. त्यांनी स्वतःच्या दोन एकर क्षेत्रात प्रथमच आईस बर्ग हे पीक घेतले. हे पीक येण्यासाठी लाल मृदा, समशीतोष्ण हवामान आणि भरपूर पाणी लागते. त्यांनी  मार्चमधील तिसऱ्या आठवड्यात लागवड केली. उन्हाळा असल्याने पाणी जास्त लागू नये याकरिता मलचींग पेपरचा वापर केला. ठिबक, मलचींग पेपर यामुळे तापमान कमी राहिले आणि पाण्याचा वापर सुध्दा कमी झाला. शिवाय तण वाढले नाही.

या सर्वाचा परिणाम उत्पन्न वाढण्यात झाला आहे.दोन एकरमध्ये आईस बर्गचे पीक लावले होते,  त्यांना यामध्ये १२ टन उत्पन्न झाले. चाळीस रुपये भावाप्रमाणे त्यांना अंदाजे पाच लाख रुपये मिळाले आहे. सुरुवातीचा खर्च दोन लाख  झाल्याने तीन लाख रुपये निव्वळ नफा राहिल्याचे समीर यांनी सांगितले. आणखी दोन एकरमध्ये त्यांनी  अशाच पद्धतीने कलिंगड लागवड केली असून पुढील आठवड्यात त्यांना १४ टन कलिंगडाचे उत्पन्न अपेक्षित आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय, रेसी ड्यू फ्री शेती करावी यासाठी ते इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like