Saturday, March 25, 2023

मशिदीवरील भोंग्यांचा त्रास आत्ताच कसा झाला?; जलील यांची राज ठाकरेंवर टिका

- Advertisement -

औरंगाबाद: राज ठाकरे यांच्या बदलेल्या भूमिकेवर खासदार इम्तियाज जलील यांनी जोरदार टीका केली आहे. ‘राज ठाकरे हे इतकी वर्षे राजकारणात आहेत. त्यांच्या कानांना आताच मशिदीवरच्या भोंग्यांचा त्रास व्हायला लागला का,’ अशी टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे.

मुंबईत काल झालेल्या मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा नारा दिला. त्यावेळी त्यांनी घुसखोरांसह मशिदीवरील भोंग्यांबद्दलही भाष्य केलं होतं. ‘धर्म प्रत्येकानं घरात ठेवायला हवा. मशिदीवरचे भोंगे बंद झाले पाहिजेत. आमची आरती कोणाला त्रास देत नाही. पण नमाजाचा त्रास होतो. नमाज पठण करण्यास आमची हरकत नाही. पण भोंगे लावून कशाला?,’ असं राज म्हणाले होते.

- Advertisement -

राज ठाकरे यांच्या या वक्तव्याचा जलील यांनी समाचार घेतला. ‘शिवसेना आता धर्मनिरपेक्ष झाली आहे. त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळं आता हिंदुत्वाचा मुद्दा कोण हाती घेणार, असा प्रश्न होता. तो मनसेनं घेतला आहे. हे केवळ राजकारण आहे. त्यांना हे आधी का आठवले नाही,’ असं जलील म्हणाले.