‘मातोश्री’ उडवून देण्याच्या धमकीचे फोन करणाऱ्याला कोलकात्यातून अटक

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान ‘मातोश्री’ उडवून देण्याच्या धमकीचे फोन करणाऱ्याला कोलकात्यातून अटक करण्यात आली आहे. पलाश बोस असं धमकी देणाऱ्या आसामचे नाव आहे. पलाश बोसने मातोश्रीसह गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकीचे फोन केले. राजकीय पक्षाशी संबंध नसल्याची माहिती एटीएसने दिली आहे.

मातोश्री उडवून देण्याच्या धमकीचे फोन करणाऱ्याला कोलकात्याहून अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ हे निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा फोन गेल्या आठवड्यात मातोश्रीवर आला होता. त्यावेळी दाऊदचा हस्तक असल्याचा दावा फोन करणाऱ्यानं केला होता. तसंच हा फोन दुबईहून आल्याचा दावा केला जात होता.

एटीएसने याप्रकरणी तपास केला असता हा फोन दुबईहून नव्हे तर कोलकात्याहून केल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात ४९ वर्षांच्या एका व्यक्तीला कोलकात्यातल्या टोलेगंज भागातून अटक करण्यात आली आहे. अटक करणाऱ्या व्यक्तीचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे एटीएसने स्पष्ट केले आहे. याच व्यक्तीने ‘मातोश्री’सह गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमक्या दिल्या होत्या. त्याने या धमक्या का दिल्या, त्याची चौकशी सुरू आहे.

दरम्यान, धमकीसाठी त्याने इंटरनॅशल सिमकार्डचा वापर केला होता. धमकी देणारी व्यक्ती दूबईत राहत होता, हे तपासात उघड झाले आहे. याची माहिती एटीएसने पत्रकार परिषदेत दिली. अटक केलेल्या व्यक्तीला कोलकातामधून मुंबईत आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले जाईल, असे एटीएसने सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी शनिवारी ५ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अज्ञान व्यक्तीकडून धमकीचा फोन आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ठार मारु आणि मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीच्या या फोननंतर मातोश्री आणि ठाकरे कुटुंबाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंना दिलेल्या धमकीनंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी, आम्ही शिवसैनिक अभेद्य भिंत बनून मातोश्रीचं रक्षण करु अशी प्रतिक्रिया देत याचा निषेध केला होता. आता एटीएसच्या तपासात कोणी फोन केला याची माहिती उघड झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like