Saturday, March 25, 2023

मुंबई ही महाराष्ट्राच्या बापाचीच ; सामनातून कंगणा आणि भाजपवर घणाघात

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून पुन्हा एकदा अभिनेत्री कंगना आणि भाजपवर टीका करण्यात आली आहे. मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या नटीमागे कोण? असा प्रश्न सामनातून उपस्थित करण्यात आला आहे. 

‘मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे. मुंबईची सतत बदनामी हा त्या कारस्थानाचाच एक भाग आहे. मुंबईस पाकिस्तान म्हणणारी एक नटी, मुख्यमंत्र्यांना अरे-तुरे म्हणणारा एक वृत्तवाहिनीचा संपादक यांच्या मागे कोण आहेत? महाराष्ट्रातील मराठी माणसाने एक व्हावे असा हा कठीण काळ आलाच आहे.’ असं देखील सामनातून म्हटलं आहे.

- Advertisement -

‘मुंबईला आधी पाकिस्तान, नंतर बाबर म्हणणाऱ्य़ांच्या मागे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष उभा राहतो हे दुर्दैवच म्हणायला हवे.’ अशी टीका देखील भाजपवर करण्यात आली आहे. मुंबईस पाकिस्तान व महापालिकेस बाबराची सेना असे बोलणाऱ्य़ांच्या मागे महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष उभा राहतो हे विचित्र आहे. पण सुशांत आणि कंगनास पाठिंबा देऊन त्यांना बिहारच्या निवडणुका जिंकायच्या आहेत. बिहारातील उच्चवर्णीय रजपूत, क्षत्रिय मते मिळविण्यासाठी हा खटाटोप आहे. असा आरोप देखील सामनातून करण्यात आला आहे.

मराठी आंदोलकांवर गोळ्या झाडणाऱ्या काँग्रेससोबत शिवसेना सत्तेत कशी, अशी विचारणा करणारे भाजपचे नेते आशिष शेलार यांनाही राऊत यांनी उत्तर दिलं आहे. ‘भाजप नेत्यांचा इतिहास कच्चा आहे. मोरारजी देसाई यांच्या आदेशाने जशी मुंबईत मराठी माणसे शहीद झाली तसे गुजरातमध्येही १६ गुजराती बांधव शहीद झाले. शिवाय या गोळीबाराविरोधात पंडित नेहरूंच्या तोंडावर राजीनामा फेकणारे चिंतामणराव देशमुख काँग्रेसवालेच होते. पण गोळीबाराचे आदेश देणाऱ्या मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात अटलबिहारी वाजपेयींपासून लालकृष्ण आडवाणींपर्यंत सर्व जनसंघीय दिग्गज सामील होते, हे विसरता येणार नाही. प्रत्येक इतिहासाला एक काळी बाजू असतेच. त्यामुळं तो खरवडत बसण्यात अर्थ नाही,’ असा टोला राऊत यांनी हाणला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’