राष्ट्रवादीमधून आलेल्या ‘या’ बड्या नेत्याला काँग्रेसने दिली मोठी जबाबदारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कॉंग्रेसच्या २३ नेत्यांनी हंगामी अध्यक्ष सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर आणि त्यानंतर झालेल्या वादळी बैठकीनंतर काँग्रेस पक्षामध्ये संघटनात्मक पातळीवर मोठे बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये आलेले बिहारचे नेते तारिक अन्वर यांना महासचिवपद देण्यात आलं असून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

काँग्रेसने कार्यकारिणीत केलेल्या फेररचनेत सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, डॉ. मनमोहन सिंग, ए. के. अँटोनी, अहमद पटेल, आंबिका सोनी, आनंद शर्मा यांचा समावेश करण्यात आला आहे. अन्वर यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी शरद पवारांनी पंतप्रधान मोदींविषयी केलेल्या वक्तव्यावर नाराज होऊन पक्ष सोडला होता. अन्वर यांना केरळची जबाबदारी देण्यात आली आहे. तर सोनिया गांधींना पत्र लिहून वादळ निर्माण करणारे गुलाम नबी आझाद यांना महासचिव पदावरून पायउतार करण्यात आले आहे. आता ते काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य आणि राज्यसभेत पक्षाचे नेते असतील. मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून महाराष्ट्राचे प्रभारी पद काढून घेण्यात आले आहे.

आता एच. के. पाटील महाराष्ट्राच्या प्रभारीपदी राहतील. रणदीप सिंह सुरजेवाला यांना बढती देण्यात आली आहे. त्यांना कर्नाटकचं प्रभारी बनविण्यात आलं आहे. त्याचबरोबर कार्यकारिणीतही स्थान देण्यात आलं आहे. त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्षांना मदत करण्यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली आहे त्यातही त्यांचा समावेश करण्यात आला आहे. पत्र लिहिणारे जितिन प्रसाद यांना पश्चिम बंगालचे प्रभारी नियुक्त करण्यात आलं आहे. तर महाराष्ट्रातले नेते मुकुल वासनिक यांना मध्यप्रदेशचं प्रभारीपद देण्यात आलं आहे. दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी बदलले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like