Friday, June 9, 2023

शिवाजी विद्यापीठात २८ फेब्रुवारीला ‘शिव-महोत्सव २०२०”चे आयोजन

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
गेली १५ वर्षे कोल्हापूरच्या प्रबोधनपर सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला ‘शिव-महोत्सव’ (शिवाजी विद्यापीठ आजी माजी विद्यार्थी स्नेहमेळावा) येत्या शुक्रवारी (दि. २८ फेब्रुवारी) सायंकाळी ४ वाजता शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात कोल्हापूर येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेला ‘शिव-जीवन गौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी इतरही शिव-पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच, दरवर्षीप्रमाणे भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती महोत्सवाचे संकल्पक व संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रविण कोडोलीकर यांनी दिली आहे.

यंदाच्या शिवमहोत्सवाचे मुख्य आकर्षण ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचा कीर्तन सोहळा असणार आहे. उपस्थितांनी येताना सोबत एक वही-पेन घेऊन यावे, ते महाराज चालवित असलेल्या आश्रमातील निराश्रित बालकांना देण्यात येईल, असे आवाहनही डॉ. कोडोलीकर यांनी केले आहे. पुरस्कार वितरण समारंभानंतर लगेचच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मी होणार सुपरस्टार’फेम श्रावणी महाजन, ‘अप्सरा आली’ कार्यक्रमाची विजेती माधुरी पवार या यंदाच्या शिव-महोत्सवात सादरीकरण करणार आहेत. सुप्रसिद्ध गायिका पुजा गोटखिंडेकर-पाटील, मिमिक्री आर्टिस्ट बाहुबली राजमाने, त्याचबरोबर श्वास अकॅडमीतर्फे सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या कार्यावर आधारित भव्य सादरीकरण होणार आहे. सँड आर्टिस्ट अमित माळकरी, ओंकार शेटे, विश्वविक्रमी नृत्य-दिग्दर्शक सागर बगाडे, चंद्रकांत पाटील, प्रसिद्ध निवेदक डॉ. सत्यजीत कोसंबी यांचाही या सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग असणार आहे.

कार्यक्रमास तंजावरचे प्रिन्स शिवाजीराजे टी. भोसले, खासदार संजय मंडलिक, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार, डॉ. विजयकुमार माने, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अण्णासाहेब खेमणार, विभागीय सहसंचालक डॉ. अशोक उबाळे, प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे, परीक्षा संचालक गजानन पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, डॉ. डी.पी. माने, श्रीमती प्रतिभा दीक्षित, प्राचार्य डॉ. डी.आर. मोरे, इतिहासकार इंद्रजीत सावंत, सुनिल पाटील (नाशिक), सचिन मांगले, डॉ. डी.के. गायकवाड, शीतल माने, शशिकांत बोराळकर, डॉ. रोहित कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका सलगर अमृततुल्य चहा आणि श्री स्वामी समर्थ नेट कॅफे, सायबर चौक येथे उपलब्ध असून प्रवेशिकांसाठी ९८२३९३१८०८, ९६६५६५०६३२, ८६६८८३७५१८, ९०९६५२५९२५ या क्रमांकांवर संपर्क साधावा. तरी, रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. कोडोलीकर यांनी केले आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.