Sunday, March 26, 2023

सत्यजित देशमुख मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित भाजपात दाखल

- Advertisement -

 सातारा प्रतिनिधी | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र सत्यजित देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करीत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भाजपाचे कमळ हाती घेतले आहे. महाजनादेश यात्रा कराडमध्ये आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उदयनराजे भोसले यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती.

 
भाजपाची महाजनादेश यात्रा सोमवारी कराडमध्ये दाखल झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित देशमुख यांचे पक्षात स्वागत केलं. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले, “कोल्हापूर-सांगलीत पुरपरिस्थिती ओढवली होती. भविष्यातील संभाव्य पूरपरिस्थती नियंत्रणाच्या अनुषंगाने उपाययोजना हाती घेण्यात येणार आहे. आपत्तीच्या काळातही टिकून राहिलं अशा पायाभूत सुविधा उभ्या करण्याचं काम करणार आहे. जागतिक बँकेचे पथक येऊन गेले आहे. त्यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आलं आहे. रस्ते, वीज पुरवठा आणि पुराच्या पाण्याचं व्यवस्थापन करणारं नियोजन या गोष्टींवर भर दिला जाणार आहे. पुरग्रस्त भागातील पाणी दुष्काळग्रस्त भागात पोहोचवण्याच काम करता येणं शक्य आहे. हे पाणी कोणत्याही राज्याच्या हिश्शाचं असणारं नाही. ते काम राज्य सरकार हाती घेत आहोत. आघाडीच्या काळात महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर होता. सध्या २५ टक्के रोजगार निर्मिती महाराष्ट्रात झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण हे खोटी माहिती देत आहे”, असे फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

 
सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे मोठे नेते आणि प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. विधान परिषदेचे माजी सभापती व सत्यजित देशमुख यांचे वडील शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर विधान परिषदेची जागा रिक्त झाली होती. तेव्हापासून सत्यजित यांना भाजपामध्ये घेण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर सत्यजित देशमुख यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. “स्वार्थावर उभ्या राहिलेल्या राष्ट्रवादीची शकलं उडायला लागली आहेत. शरद पवारांनी शिवाजीराव देशमुख साहेबांवर अन्याय केला. त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्न केले”, अशी टीका सत्यजित देशमुख यांनी भाजपा प्रवेशापूर्वी केली.