दिल्ली : अयोध्या विवाद प्रकरणी १३ जुलैला न्यायालयीन सुनावणी होणार आहे. याआधी १७ मे रोजी यापुढील सुनावणी उन्हाळ्याची सुट्टी संपल्या नंतर सुरू होईल असे सुनावणीदरम्यान न्यायालयाने जाहीर केले होते. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एसए नजीर यांच्या न्यायपीठाने १७ मे रोजी हिंदू संघटनांचा युक्तिवाद ऐकला होता. आता १३ जुलै रोजी मुस्लीम पक्षकारांची बाजु एकली जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय न्यायपीठासमोर सुन्नी वक्फ बोर्डाच्यावतीने वकील राजीव धवन यांनी शुक्रवारी युक्तिवाद केला. ‘मशिदी मनोरंजनासाठी तयार होत नाहीत तर तेथे हजारों लोक नमाज (प्रार्थना) करून धर्माच्या पालनाचे कर्तव्य करतात’ असे मत धवन यांनी मांडले आहे. ‘हे इतके पुरेसे नाही काय?’ असा सवालही त्यांनी न्यायालयाला केला आहे. अयोध्या प्रकरणात मूळ याचिका सादर करणाऱ्या एम. सिद्दीकी यांचे निधन झाले आहे. त्यांचे कायदेशीर वारस त्यांचे प्रतिनिधीत्व करत असून त्यांचे उत्तराधिकारी एम. इस्माईल फारूकी हे अयोध्या प्रकरणाचा खटला चालवत आहेत.