सांगली प्रतिनिधी| प्रथमेश गोंधळे
अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या ६० वर्षीय वृद्ध नराधम धर्मेंद्र माने याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी सात वर्षाची शिक्षा सुनावली. सदरचा गुन्हा १४ मे २०१५ रोजी घडला होता. यातील पीडित मुलीचे वडील आणि आरोपी शेजारी आहेत. घटने दिवशी यातील आरोपी जगदाळे वस्तीवरील बोरिंगमधून पाणी आणण्यासाठी सायकलवरून त्या पीडित मुलीला घेऊन गेला होता. बराचवेळ झाला तरी मुलगी व आरोपी परत न आल्याने मुलीचे आई-वडील तिला शोधण्यासाठी जगदाळे वस्तीकडे गेले. तेथे त्यांना आरोपीची सायकल दिसून आली. परंतु आरोपी व मुलगी दिसून आली नाही. त्यानंतर त्यांनी जवळच असलेल्या वगळीकडे जाऊन पहिले असता आरोपी त्या मुलीवर झाडाच्या आडोशास जबरदस्ती करताना दिसला. दोघांनी पळत जाऊन आरोपीस पकडण्याचा प्रयत्न केला. तो इथून पळून गेला.
आई-वडिलांनी तिच्याकडे चौकशी केली असता तिने खाऊसाठी पैसे देतो असे सांगून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. पीडित मुलीच्या वडिलांनी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याचा तपास विटा पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक घोंगडे यांनी केला. आरोपीला तात्काळ अटक केली. त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सरकारपक्षातर्फे ९ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पीडित मुलगी, पंच, वैद्यकिय अधिकारी व तापसी अधिकारी यांच्या साक्षीपुराव्याच्या आधारे आरोपीला शिक्षा सुनावली.