सुभादीप राहा लिखित, दिग्दर्शीत आणि गिरीश परदेशी, गीता गुहा, अमित कुमार व प्रमिती नरके आदी कलाकारांच्या उत्कृष्ठ अशा अभिनयातून साकारल्या गेलेल्या “हॅश अर्नेस्टो, टॅग गव्हेरा..” या नाटकावरती भाष्य करणारा डाॅ. संजय दाभाडे यांचा लेख.
सुदर्शन हॉल, पुणे इथं अलीकडेच “हॅश अर्नेस्टो, टॅग गव्हेरा..” ह्या नाटकाचा प्रयोग झाला. अगदी चांगल्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. चे गव्हेरा हा कार्यकर्त्या तरुणाईचं एक स्फूर्तिस्थान राहिलंय जगभरात. ६०, ७० च्या दशकातील तरुणाईचा हिरो होता चे.
अर्जेंटिना मधील डॉक्टरकीचं शिक्षण घेतलेला एक तरुण..प्रवासाला निघतो, रोगराईचं मूळ कारण दारिद्र्यात असल्याचं त्याच्या लक्षात येतं..आणि मग तो मूलभूत परिवर्तनाच्या क्रांतिकारक लढाईत सहभागी होतो..पुढं त्याची भेट क्युबन क्रांतिकारक फिडेल कॅस्ट्रो सोबत होते अन दोघे जिवलग कॉम्रेड्स होतात..चे फिडेलच्या लढाईत सहभागी होतो, क्युबन क्रांती यशस्वी होते..चे सरकार मध्ये सहभागी होतो, पण सत्तेत जीव रमत नाही म्हणून पुन्हा अपरात्री उठून सत्ता त्यागून पुन्हा तो गोरगरीब शोषितांच्या संघर्षात सहभागी होतो..आणि शहीद होतो…
हि सगळी स्टोरी मी बीजे मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी असतांना मला कळली, ती अरुण साधूंच्या फिडेल, चे आणि क्रांती ह्या सुंदर पुस्तकातून..मी अक्षरशः भारावून गेलेलो चे चं व्यक्तिमत्व बघून…माझ्या ‘डावीकडे’ वळण्याची बीजे बहुधा चे वाचण्यातून व नंतर धारावीत काही काळ मुक्काम केल्यातून रोवली गेली असावीत. पुण्यातील अनेक वसतिगृहांतून ते पुस्तक फिरत राहिलं..व अनेकांवर चे ची मोहिनी पडली.
तर असा हा मला प्रचंड भावलेला चे गव्हेरा …! त्याच्यावरचं ” हॅश अर्नेस्टो, टॅग गव्हेरा..” हे नाटक पुण्यात होतंय म्हटल्यावर ते सोडणं अशक्य होतं. प्रा. हरी नरके सरांनी नाटकाच्या प्रयोगाची पोस्ट फेसबुकला टाकल्यामुळे मला हि संधी मिळाली, अन्यथा मला प्रयोगाबद्दल माहिती नसती मिळाली. त्यासाठी नरके सरांचे मनापासून आभार .
सुभादीप राहा, ह्या प्रतिभावंन्त दिगदर्शकाने व लेखकाने हे नाटक समोर आणलंय. गिरीश परदेशी, गीता गुहा, अमित कुमार आणि प्रमिती नरके ह्यांच्या खूप खूप ताकदीच्या भूमिका झाल्या आहेत. या नाटकाला भारतातील नक्सलवादी चळवळीची पार्श्वभूमी आहे. राजश्री नावाची तरुण प्राध्यापिका नक्षल सिम्पथायझर असते, आणि ती सत्य समजून घेण्यासाठी जंगलात येते..तिथं तिची धाकटी बहिण (भूमिका प्रमिती नरके ) देखील असते व ती काही मूलभूत सवाल उपस्थित करते … प्रमितीनं खुप प्रभावीपणे तीची भूमिका बाजावलीय. नरकें सरांची मुलगी म्हणुन नव्हें तर प्रमिती तीची स्वतंत्र ओळख निर्माण करतेय हें मला मनापासून भावलं.
तिथंच राजश्री ला चे भेटतो….
तो खरंच चे असतो का..?
नाटक बघून कळेल ते…
विशिष्ट रूपात सगळ्या जगाला परिचित असलेल्या रूपातच हुबेहूब चे दिसतो…
त्याची ती दाढी, डोक्यावर विशिष्ट कॅप, सिगार…
मस्त काम केलंय गिरिशनी.
चे बद्दल व सध्याच्या परिस्थितीबद्दल माहिती असणाऱ्या अभ्यासक व कार्यकर्त्यांनाच प्रामुख्याने हे नाटक नीट समजू शकेल, हि ह्या नाटकाची मर्यादा असली तरी चे बघायला मिळणं ह्याच अप्रूप वाटतं.
“येस, आय एम डेड ….
बट आर यु अलाइव्ह ….?”
चे कडून असा भेदक प्रश्न आपल्या अंगावर येतो ….
आणि आपण खरंच जिवंत आहोत का , अन जीवंत असलो तर जिवंत असणं म्हणजे काय हे प्रश्न तात्काळ अस्वस्थ करतात आपणाला ….
चे तर शहीद झाला …हि इज डेड …
बट व्हॉट अबाउट मी …
मी तरी जीवनात कुठंय….?
हा प्रश्न आपला पिच्छा करतो ….
” डाउट एव्हरीथिंग ….”
हा आणखी एक इशारा समोर येतो….
चिकित्सा, हि चळवळीची मूळ आधार असते हे अधोरेखित होतं.
एकंदरीत परंपरागत चौकटी मोडून वेगळ्या पद्धतीनं सादर केलेलं हे नाटक आहे..चे गव्हेराच्या चाहत्यांना व समकालीन सामाजिक व राजकीय दृष्ट्या संवेदनशील असणाऱ्यांना हे नाटक काही काळ का असेना थेट ‘चे ‘ जवळ घेऊन जातं यात वाद नाही..
डॉ. संजय दाभाडे.
संपर्क क्र – ९८२३५२९५०५
[email protected]