पुणे : शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणार्या पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाने यावर्षीपासून काही विषयांचे मराठी माध्यमाचे वर्ग बंद केले असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे इथून पुढे फर्ग्युसन महाविद्यालयात मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना नो एन्ट्री असणार की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. पुणे विद्यापिठाअंतर्गत येणार्या एफ.सी. महाविद्यालयात पदवीच्या दुसर्या वर्षापासून स्पेशलायझेशनसाठी एक विषय विद्यार्थ्यांना निवडावा लागतो. महाराष्ट्रच्या कानाकोपर्यातून पुण्यात शिक्षणासाठी येणार्यांची संख्या मोठी आहे. त्यामधे बहुतांश विद्यार्थी ग्रामिण भागातील असून मराठी माध्यम निवडणार्यांचे प्रमाण त्यात अधिक आहे. परंतु चालू वर्षापासून समाजशास्त्र आणि इतिहास आदी विषयांमधे स्पेशलायझेशन करु इच्छिणार्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमाचा पर्याय उरलेला नाही. त्यामुळे ग्रामिण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. शिवाय हा निर्णय महाविद्यालय प्रशासनाने कसलीही पुर्वकल्पना न देता घेतला असल्याने आता विद्यार्थ्यांना स्पेशलायझेशनसाठी अपरिहार्यपणे वेगळे विषय निवडावे लागत आहेत. महाविद्यालयाच्या या निर्णयाविरोधात विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. महाविद्यालय प्रशासनाने सदर निर्णय मागे घ्यावा किंवा विद्यापिठाची संबधीत निर्णयासंदर्भातील अधिसुचना आम्हाला दाखवावी असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. “आजपर्यंत महाविद्यालयात सर्व विषयांकरिता मराठी माध्यमाचा पर्याय उपलब्ध होता..मग या वर्षी असं नेमकं काय झालं की महाविद्यालय प्रशासनाने समाजशास्त्र आणि इतिहास या विषयांचे मराठी माध्यमाचे वर्ग बंद करण्याचा निर्णय घेतला?” असा प्रश्न उपोषणाला बसलेल्या रामेश्वर क्षिरसागर या विद्यार्थ्याने विचारला आहे. “आम्ही गेले काही दिवस महाविद्यालय प्रशासनाकडे मराठी माध्यम सुरु ठेवण्याची विनंती करत आहोत परंतु यापूर्वीही विद्यापिठाची यासाठी परवानगी नव्हती. आम्ही विद्यार्थी हितासाठी आजपर्यंत मराठी माध्यमाचे वर्ग चालवले असे महाविद्यालय प्रशासनाचे म्हणणे आहे” असे कौस्तुभ पाटील याने सांगीतले. महाविद्यालयाशी संपर्क साधला असता प्रचार्य उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले.
Home ताज्या बातम्या आता फर्ग्युसन महाविद्यालयात मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना नो एन्ट्री, विद्यार्थ्यांचा प्राचार्यांच्या कॅबिनसमोर ठिय्या