इंदौर : आध्यात्मिक गुरु भैयुजी महाराज यांनी आज त्यांच्या राहत्या घरी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. राष्ट्रसंताचा दर्जा प्राप्त झालेले भैयुजी महाराज इंदौर येथे वास्तव्यास होते. काही महीण्यांपूर्वीच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा बहाल केला होता. भैयुजी महाराजांच्या आत्महत्येने त्यांच्या शिष्यांना चांगलाच धक्का बसला आहे. आत्महत्या करण्याच्या काही तास अगोदर ते ट्विटरवर अॅक्टिव होते. मग नंतरच्या तासाभरात असे काय घडले की भैयुजी महाराजांनी आत्महत्या केली असा प्रश्न पडल्याने उलट सुलट चर्चांना उधान आले होते. पंरतु त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोट नुसार मानसिक तणावातून आत्महत्या करत असल्याचे समोर आले आहे. माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरु नये असेही त्यांनी लिहीले आहे. मागील वर्षीच ग्वालियरच्या डाॅ. आयुषी शर्मा यांच्यासोबत भैयुजी महाराजांनी दुसरा विवाह केला होता. दुसरा विवाह झाल्यापासून भैयुजी महाराजांच्या घरामधे तणावाचे वातावरण होते असे बोलले जात आहे. घरघुती ताणतणावामधूनच भैयुजी महाराजांनी आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक निरिक्षणातून दिसत आहे.