आरक्षण न मिळाल्यास मराठा तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील; संभाजी ब्रिगेडचा गंभीर इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. त्या दृष्टीने न्यायालयात बाजू मांडण्यात केंद्र आणि राज्य सरकार अपयशी ठरल्याने, मराठा समाज बळी ठरला आहे. अशा शब्दात संभाजी ब्रिगेड संघटनेने (sambhaji brigade) केंद्र, राज्य सरकारवर सडकून टीका केली. तसेच लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास मराठा समाजातील तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील, असा गंभीर इशाराही संभाजी ब्रिगेडने दिला. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यावर संभाजी ब्रिग्रेडने आज भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी संभाजी ब्रिगेडने हा इशारा दिला.

याशिवाय मराठा आंदोलनातील ५० तरुणांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. त्यासाठी आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू, असं सांगतानाच मराठा समजाला कायद्याच्या कसोटीवर टीकणारं आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. राम मंदिर, तीन तलाक आणि काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकार पुढाकार घेते, मग मराठा आरक्षणासाठी का घेत नाही? मराठा आरक्षण हा सुद्धा श्रद्धा आणि अस्थेचा विषय असून केंद्र आणि राज्याने आपल्या राजकारणात मराठा आरक्षणाचा बळी देऊ नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

राज्यातील आघाडी सरकार केंद्र सरकारच्या नाकावर टिच्चून आलं आहे. राज्यातलं सरकार सत्तेत कसं आलं. त्यात आम्हाला पडायचं नाही. पण तुमच्या राजकारणासाठी आमचा बळी देऊ नये. कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण देण्याची जबाबदारी जशी सत्ताधाऱ्यांची आहे, तसेच विरोधकांनीही पुढे येऊन या कामी समन्वय साधावा. सत्ताधारी आणि विरोधकांनी मिळून केंद्राकडे आरक्षणाचा पाठपुरावा केला तर आरक्षण मिळण्यात अडचण होणार नाही, असंही संभाजी ब्रिगेडने म्हटलं आहे.

हा मराठा तरुणांच्या भविष्याचा प्रश्न आहे. तो सुटला नाही तर मराठा तरुण नक्षली मार्गाकडे जातील, अशी भीती व्यक्त करतानाच तरुणांनी व्यथित होऊ नये. आरक्षणासाठी आत्महत्येचा मार्ग अवलंबू नये. तुमच्या व्यथा आमच्याकडे मांडा. तुमच्या हाताला रोजगार देण्याचं काम आम्ही करू. तुमच्या शंका आणि प्रश्नाचं निरसनही आम्ही करू. पण कोणताही अततायी मार्गाचा अवलंब करू नका, असं आवाहनही त्यांनी केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.