प्रथमेश गोंधळे, प्रतिनिधी सांगली |
१३९ कोटी ३५ लाख ९९ हजार रुपयांच्या तसेच २० कोटी ७९ लाख ९५ हजार रुपये शिलकीच्या अर्थसंकल्पाला आज इस्लामपूर पालिकेच्या सभेत मंजुरी देण्यात आली. तोट्यात चालणारा पाणीपुरवठा विचारात घेऊन एक हजार लिटरला १० रुपये पाणीपट्टी वाढविण्याच्या प्रशासनाच्या सूचनेला सभागृहात सर्वानुमते विरोध झाल्याने ही वाढ रद्द करण्यात आली. नगराध्यक्ष निशिकांत पाटील, मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्या उपस्थितीत सभा झाली.
क्रीडा संकुल उभारणी, खेळाची मैदाने, मॅरेथॉन स्पर्धा, हुतात्मा स्मारकाचे आधुनिकीकरण तसेच ऐतिहासिक वारशाचे संवर्धन यासह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निवासाची व्यवस्था, अभ्यासिकांची संख्या वाढवणे, प्रभागनिहाय पर्यावरण पूरक उद्याने, ओपन जीम, योगापार्क, पूर्ण घनकचरा संकलन, वर्गीकरण व प्रक्रिया केंद्र उभारणे, बचतगट विपणन केंद्र व घरकुल योजनेची शंभर टक्के अंमलबजावणी आदी संकल्प करण्यात आले आहेत. नगरसेवक संजय कोरे यांनी समाजकल्याण वसतिगृह इमारत तातडीने वापरात आणण्याची गरज मांडली. बजेट २ कोटी ७९ लाखाचे महसुली तुटीचे असल्याने काटकसर करण्याची सूचना केली.
विश्वनाथ डांगेनी वास्तववादी अर्थसंकल्पाची अपेक्षा मांडली. शहाजी पाटील यांनी अर्थसंकल्पात इच्छाशक्ती कमी असल्याचा आरोप करत प्रेरणा अभियानाचा उल्लेख नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. विक्रम पाटील यांनी एक कोटी खर्चाच्या जलतरण तलावाच्या प्रस्तावाची सूचना करत व्यावसायिकांना एनओसी देताना ५ हजार रुपये घेतले जातात, ते कमी करण्याची मागणी केली.