उसाच्या अधिक आणि किडविरहित उत्पादनासाठी ऊस बेणेप्रक्रिया ; जाणून घेऊया नक्की कशी आहे प्रक्रिया आणि याचे फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। ऊस उत्पादन आणि उत्पादकतेमध्ये घट आणणाऱ्या रोग किडींचे नियंत्रण करण्यासाठी बेणे प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे.  वाढणाऱ्या रासायनिक खतांच्या किमती आणि वेळेवर उपलब्ध न होणारी रासायनिक खते यामुळे  उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत ऊसासाठी ऍझेटोबॅक्‍टर व स्फुरद विघटक जिवाणूंची प्रक्रिया केल्यास आपण रासायनिक खताची बचत करू शकतो. ऊसामध्ये  शुद्ध, निरोगी आणि चांगल्या बेण्याचा वापर केल्यास ऊस उत्पादनामध्ये १० ते १५ % वाढ झाल्याचे सिद्धदेखील झाले आहे.शुद्ध निरोगी आणि चांगल्या बेण्याच्या अभाव हे ऊसाच्या उत्पादनात घट होण्याचे प्रमुख कारण आहे.  

ऊसाच्या बेणेप्रक्रियेच्या दोन पद्धतींची माहिती आपण करून घेऊया. यामध्ये रासायनिक बेणेप्रक्रिया आणि जैविक बेणेप्रक्रिया असे दोन प्रकार आहेत. रासायनिक बेणेप्रक्रियेत लागवडीसाठी बेणे मेळ्या तील दहा ते अकरा महिन्याचे रसरशीत व शुद्ध बेणे वापरावे. सर्वप्रथम अशा ऊसाच्या एक किंवा दोन डोळ्यांच्या टिपऱ्या खांडून  घ्याव्यात.  त्यानंतर 100 लिटर पाण्यात 100 ग्रॅम कार्बेन्डाझिम आणि 300 मिली मॅलेथिऑन किंवा डायमेथोएट मिसळून द्रावण तयार करून घ्यावे. ऊसाच्या एक किंवा दोन डोळ्यांच्या टिपऱ्या या द्रावणात दहा मिनिटे बुडवून काढाव्यात. या रासायनिक बेणे प्रक्रियेमुळे ऊसावर सुरुवातीच्या काळात येणारे खवले कीड आणि पिठ्या ढेकूण या किडीपासून आणि जमिनीमधून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळते.  बेण्याची उगवण चांगली होते तसेच रोपांची सतेज जोमदार वाढ होतेच शिवाय उत्पादनही वाढते.

रासायनिक बेणेप्रक्रिया नंतर ऊसाच्या टिपर्‍या यांना जैविक बेणेप्रक्रिया करावी. यासाठी प्रथम १०० लिटर पाण्यात १० किलो ऍझेटोबॅक्‍टर जिवाणूसंवर्धक आणि .२५० किलो स्फुरद विघटक जिवाणूसंवर्धक चांगल्याप्रकारे मिसळावे. त्यानंतर ऊसाच्या टिपऱ्या या द्रावणात ३० मिनिटे बुडवून लागवडीसाठी वापराव्यात. ऊसाच्या टिपर्‍या मध्ये ऍझेटोबॅक्‍टरचा शिरकाव होऊन सदर जिवाणू उगवणीनंतर ऊसामध्ये आंतरप्रवाही अवस्थेत राहून हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून हा नत्र ऊसाला उपलब्ध करून देतात. त्यामुळे ऊसाला वापरण्यात येणाऱ्या रासायनिक नत्र खत( युरिया) त पन्नास टक्के बचत करता येते. त्याचप्रमाणे सदर मिश्रणात वापरण्यात आलेले स्फुरद विघटक जिवाणू ऊसाखालील जमिनीतील अविद्राव्य स्फुरदाचे विघटन करून ऊसाला स्फुरत उपलब्ध करून देतात. स्फुरद विघटक जिवाणू संवर्धकाच्या वापरामुळे ऊसाला वापरण्यात येणाऱ्या रासायनिक स्फुरत खतात २५ टक्के बचत करता येते.

बेणेप्रक्रियेमुळे बेण्याची उगवण चांगली होते तसेच रोपे सत्तेच व जोमदार दिसतात. यामुळे सुरुवातीच्या काळात पिकास कीड व रोगांपासून संरक्षण मिळते. उगवणीनंतर रोग व कीड नियंत्रण यापेक्षा बेणेप्रक्रिया कमी खर्च व कमी वेळ लागतो. जैविक बेणे प्रक्रियेमुळे रासायनिक खतात बचत करता येते. उत्पादन वाढीवर जमिनीची सुपीकता टिकून राहते. त्यामुळे उत्तम ऊस लागवडीसाठी बेणेप्रक्रिया चांगला पर्याय आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’