सोलापूर प्रतिनिधि | अमेरिकेने एकादशीच्या दिवशी अंतराळात यान सोडलं म्हणून अमेरिकेची चांद्रयान मोहीम यशस्वी झाली, असा अजब दावा शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केला आहे. त्यामुळे भिडे यांच्या या विधानावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नवरात्रीमध्ये शिवप्रतिष्ठानच्या वतीने दुर्गामाता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याच्या तयारीसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला संबोधित करताना संभाजी भिडे यांनी हा अजब दावा केला. ब्रह्मांडातील नक्षत्रांची स्थिती एकादशीला संतुलित असते. त्यामुळेच अमेरिकेने एकादशीच्या दिवशी त्यांचे यान अंतराळात सोडल्याने त्यांची मोहीम यशस्वी झाली.
भारतीय कालमापण पद्धतीमुळेच हे शक्य झाल्याचा दावा भिडे यांनी केला आहे.भारतीय कालमापन पद्धतीत एका सेकंदाचा हजारावा भाग मोजण्याची क्षमता आहे. त्यामुळेच चांद्रमोहीम राबविताना अमेरिकेने आपल्या कालमापन पद्धतीचा आधार घेतला. चंद्रावर उपग्रह सोडण्याचे अमेरिकेचे ३८ प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यानंतर नासाच्या वैज्ञानिकांनी आपल्या कालमापन पद्धतीचा अभ्यास केला आणि एकादशीच्या दिवशी उपग्रह अंतराळात सोडून चांद्रयान मोहीम फत्ते केली, असं तर्कटही त्यांनी मांडलं. भारताच्या चांद्रमोहीमेला आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर भिडे यांनी हा दावा केला आहे.