पंढरपूर : एसटी कर्मचा-यांनी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपामुळे लाखो प्रवाशांचे हाल झाले आहेत.
पगारवाढीसह इतर विविध मागण्यांसाठी गुरूवारी मध्यरात्रीपासून एसटी कर्मचा-यांनी संपाची हाक दिली. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कर्मचा-यांच्या तेरा संघटनांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मागे ऐन दिवाळीत एसटीने मोठा संप केला होता. न्यायालयाने या संपात हस्तक्षेप करत एसटी कर्मचा-यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र परिवहन मंत्री आणि महामंडळ प्रशासनाकडून कर्मचा-यांच्या मागणीला योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने कर्मचारी वर्गात असंतोष पसरला होता. त्यातूनच या संपाची तयारी केली गेली. सध्या सुट्ट्यांचा हंगाम चालू असल्याने विविध पर्यटनस्थळांवर आणि तिर्थस्थळांना गेलेल्या लाखो लोकांचे या संपाने अतोनात हाल होताना दिसतात.
पंढरपूरात दर्शनासाठी आलेले तब्बल एक लाख भाविक एसटीअभावी बसस्थानकात आणि रेल्वेस्थानकावर ताटकळत बसले आहेत. या संपाचा गैरफायदा घेत खाजगी वाहनचालक प्रवाशाकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारत आहेत. सरकारने कर्मचा-यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करून हा तिढा सोडवावा अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
गोपाळ देवकत्ते