उस्मानाबाद प्रतिनिधी | शिवसेनेचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह अन्य ५ जणांवर फसवणुकीचा आणि शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तड़वळे या गावातील दिलीप ढवळे या शेतकऱ्याने स्वतःची फसवणूक झाल्यामुळे दि. १२ एप्रिल २०१९ रोजी गळफास घेवून आत्महत्या केली होती. दरम्यान त्यावेळी शेतकऱ्याच्या आत्महत्या केलेल्या घटनास्थळी जप्त केलेल्या चिट्टीमध्ये ‘त्याने तेरणा कारखाना सुरु करण्यासाठी २०१० या साली कर्ज घेतले होते. मात्र कारखान्याने पैसे न भरल्याने तणावाखाली आणि दुष्काळामुळे आत्महत्या करीत असल्याचे त्याने नमूद केले होते.’ त्यांनतर त्यांचा पुतण्या राज ढवळे यांनी पोलिसात गुन्ह नोंद करत तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी तब्बल ५ महिने तपास केल्यांनतर गुन्हा नोंद केला आहे.
तेरणा कारखान्याने कर्जापोटी ढवळे यांची जमीन वसंतदादा सहकारी बँकेकडे गहाण ठेवली होती. कारखान्याने कर्ज न भरल्याने बँकेने ढवळे यांची जमिन लिलावात काढली होती. या तणावामुळे ढवळे यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी ढवळे यांच्या खिशात २ वेगवेळ्या चिट्ठ्या सापडल्या होत्या. त्यातील एका चिट्ठीत त्यांनी आत्महत्येस ओमराजे निंबाळकर आणि वसंतदादा बँकेचे चेअरमन विजय दंडनाईक जबाबदार असल्याचा उल्लेख केला होता. तर दुसऱ्या चिट्ठीत १३ शेतकऱ्यांनी तेरणा कारखाना बाबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र भेट झाली नाही असे सांगत व्यथा मांडल्या होत्या.
त्याचबरोबर शिवसेनेचे लोकसभा उमेदवार ओमराजे यांना मतदान न करण्याचे आवाहन देखील केले होते. शेतकरी ढवळे यांच्या आत्महत्येचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत चांगलाच गाजला होता. तसेच शरद पवार यांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली होती तर उद्धव ठाकरे यांनी जाहीर भाषणात शेतकऱ्याला न्याय देण्याचे आश्वासन देखील दिले होते.