ओवेसींनी घेतली ‘वंचित’च्या पदाधिकाऱ्यांची भेट, ‘बाळासाहेबांना’ समजावण्याची घातली गळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी। विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज अखरेचा दिवस आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची एकत्र निवडणुक लढवण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामागचे कारण म्हणजे, औरंगाबाद येथे एमआयएम उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेल्या खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी वंचितच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. या भेटीत ओवेसी यांनी वंचितच्या पदाधिकाऱ्यांना प्रकाश आंबेडकरांना आघाडीसाठी समजावण्याची विनंती केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, एमआयएमने औरंगाबादमधील तीनही मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यांच्या प्रचारासाठी ओवेसी औरंगाबादेत आले होते. त्यांची बुधवारी सभा झाली. त्यानंतर गुरूवारी सकाळी त्यांनी वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये भेट घेतली. यावेळी ओवेसी म्हणाले, “आजही वंचितसोबत आघाडी करायला तयार आहे. बाळासाहेबांना कोण काय बोलले हे मला माहिती नाही. तुम्ही त्यांना समजवा. औरंगाबाद मध्य मधून आमचा विद्यमान आमदार आहे. असे असताना आम्ही ती जागा कशी सोडणार? शहरात वंचितचा आमदार हवा ही मागणी रास्त आहे, त्यासाठी आम्ही पश्चिमची जागा सोडण्यास तयार होतो. या जागेवरूनही जलील माझ्याशी भांडले. पण, मी त्यांची समजूत काढली. मी त्यांना म्हणालो आपल्याला वंचितसोबत आघाडी करायची आहे. पश्चिमची जागा द्यावी लागेल,” असं ओवेसी वंचितच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना म्हणाले.

तत्पूर्वी, लोकसभा निवडणूक एक दिलाने लढणाऱ्या एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी समाधानकारक जागा न दिल्याने वेगळे होत आहोत असं एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले होते. परंतु आता ओवेसींच्या एकत्र येण्याच्या विनंतीला आंबेडकर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Leave a Comment