कराड पोलिसांची मोठी कारवाई, पवन सोळवंडे खूनप्रकरणी ‘या’ अट्टलांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड रेकॉर्डवरील गुन्हेगार पवन सोळवंडे याच्या खूनप्रकरणी अल्ताफ पठाण, जुनेद शेखसह आठ संशयितांना पोलिसांनी अटक केली असतानाच आणखी सहा जणांना शनिवारी ताब्यात घेतले. संशयित हल्लेखोरांनी गुन्ह्यात वापरलेले पिस्टल हस्तगत करण्यासाठी पोलीस पथक रात्री उशिरा रवाना झाले आहे.

सिकंदर शेख, महादेव मोकाशी, विजय पुजारी, नीरज पाणके, दिवाकर गाडे, प्रमोद जाधव अशी ताब्यात घेतलेल्या सहा जणांची नावे असल्याचे पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी सांगितले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी मध्यरात्री पवन सोळवंडे याचा सहा ते सात हल्लेखोरांनी गोळ्या घालून खून केला होता. याप्रकरणी जुनेद शेख, समीर मुजावर, अल्ताफ पठाण, निहाल पठाण, शिवराज इंगवले, मजहर पिरजादे, हैदर मुल्ला, पप्पू काटे यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे सलग दोन दिवस कसून चौकशी सुरू आहे. चौकशीत आणखी काही नावे निष्पन्न झाली. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता.

पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, कराड ग्रामीणचे किशोर धुमाळ यांच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणाहून शनिवारी रात्री सहा जणांना ताब्यात घेतले. पोलिसांकडून अजूनही धरपकड सुरू आहे. शिवाय हल्लेखोरांच्या संपर्कात आणखी कोण कोण आहे? आणि त्यांना कोण मदत करत आहे? याच्यावर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र पोलीस पथक तयार केले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खून प्रकरणाचा अत्यंत गांभीर्याने तपास करत गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी कठोर पावले उचलल्याची चिन्हे आहेत.

Leave a Comment