कांदा निर्यातबंदीच्या विरोधात कळवण येथील शेतकरी आक्रमक

संग्रहित छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी। केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी जाहीर केल्याने कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असुन निर्यातबंदी तत्काळ हटवावी या मागणीसाठी सतंप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज कळवण येथे रास्ता रोको आंदोलन करत केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. सध्या कांद्याला चांगला भाव असताना केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याने कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत.

सरकारच्या या निर्णयाविरोधात सोमवारी सकाळी कळवण तालुक्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कळवण बसस्थानकासमोर आंदोलन केले. सरकारने हा निर्णय त्वरीत मागे घेण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. तर कांद्याला चांगला भाव असताना सरकारने हा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार असून सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला आहे. शेतकऱ्यांनी अचानक केलेल्या आंदोलनामुळे वाहनांचा दुतर्फा रांगा लागल्या होत्या. पोलिस निरिक्षक प्रमोद वाघ यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

दरम्यान, मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला सोमवारी १ हजार क्विंटलची आवक होती. बाजार समितीत विकायला आलेल्या या कांद्याला किमान ११०० ते कमाल ३३८५, म्हणजे सरासरी ३१०० असे दर मिळाले. मात्र दहा दिवसांपूर्वी याच कांद्याचे दर सरासरी ४२०० रुपये इतके होते. हंगामातील तो सर्वाधिक दर होता. सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने कांद्याचे भाव अचानक गडगडले आहेत. परिणामी आर्थिक नफ़्याच्या आशेत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.