कांदा निर्यात बंदीमुळे भारताच्या प्रतिमेला धक्का बसून याचा थेट फायदा पाकिस्तानला होईल ; शरद पवारांचा पियुष गोयल यांना सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने अचानकपणे घेतलेल्या कांदा निर्यात बंदीमुळे भारताची आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा एक खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला मोठा धक्का बसेल आणि याच थेट फायदा पाकिस्तान आणि इतर जे कांदा निर्यातदार देश आहेत त्यांना होईल, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री  पियुष गोयल यांना दिला आहे.

केंद्र सरकारने अचानकपणे सोमवारी कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले आहे. शेतकऱ्यांनी केंद्राच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर  शरद पवारांनी कांदा निर्यात बंदीबाबत केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री  पियुष गोयल यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीआधी त्यांनी ट्वीट करून आपली भूमिका मांडली.

शरद पवार म्हणाले की केंद्र सरकारने आकस्मिकपणे कांद्याची निर्यातबंदी जाहीर केली. त्यावर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक पट्ट्यामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली व विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी माझ्याशी सोमवारी रात्री संपर्क करून केंद्र सरकारला या प्रतिक्रियेबाबत अवगत करण्याची विनंती केली. आज सकाळी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांची परिस्थिती विशद केली.

निर्यात होणाऱ्या कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे व आपण सातत्याने कांदा निर्यात करत आलो आहोत. पण केंद्र सरकारने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा एक खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून भारताची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला मोठा धक्का बसतो’, असं शरद पवारांनी गोयल यांना सांगितले.

‘या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात भारत हा निर्यातीच्या बाबतीत एक बेभरवशाचा देश आहे अशी भारताची प्रतिमा जगात बनेल .आणि या परिस्थितीचा थेट फायदा पाकिस्तान आणि इतर जे कांदा निर्यातदार देश आहेत त्यांना होईल, अस पवार म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’