अचलपूर : कामबंद आंदोलन करा काहीही करा, बच्चू कडू मागे हटणार नाही, जे कामचुकार आहेत त्यांना दणका,जे चांगले आहेत त्यांच स्वागत, सामान्य माणसाला छळल्यास सेवा हमी कायदयाचा वापर मजबुतीने केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कामचुकार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. अचलपूर विभागाअंतर्गत अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीनंतर त्यांनी हे मत व्यक्त केले.
मी ‘अशा’ कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अमरावती जिल्हाच्या दर्यापूर येथील पुरवठा विभागातील दोन कर्मचाऱ्यांवर कर्तव्यामध्ये कसूर केल्याप्रकरणी थेट निलंबित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी तसेच मंत्रालयात पाठवला होता. या सर्व बाबीनंतर जिल्ह्यातून जिल्हाधिकारी कार्यालय येथे बच्चू कडू यांच्याविरोधात कामबंद आंदोलन करण्यासाठी पाऊले उचलली गेली. मात्र बच्चू कडू यांनी अशा कोणत्याही दबावाला मी बळी पडत नसून जो कोणी शासकीय कर्मचारी वा अधिकारी सेवा हमी कायद्यानुसार सेवा देत नसेल तर तो माझ्या तावडीतून सुटू शकत नाही, मग तो माझ्या जवळचा असला तरी मी विचार करणार नाही अशी प्रतिकिया देत कामचुकार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले.