हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिल्ली निवडणुकांसाठी अवघ्या २ आठवड्यांचा अवधी शिल्लक असताना दिल्लीतील सामान्य नागरिकांनीही प्रचारात सहभाग घ्यायला सुरुवात केली आहे. रिक्षावाले, सामान्य नागरिक, डॉक्टर्स, शिक्षक यांनी अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाची निवडणूक मोहीम हाती घेतली असून हटक्या पद्धतीने प्रचार करायला सुरुवात केली आहे. या संदर्भात #केजरीवालनामहै_उसका हा मथळा ट्विटरवर पहिल्या १० ट्रेंडिंग हॅशटॅगमध्ये समाविष्ट झाला असून दिल्लीच्या निवडणुकीत सामान्य जनता काय विचार करणार याचं चित्र स्पष्ट व्हायला आता सुरुवात झाली आहे.
वीज बिल शून्य करून दाखवले, उत्तम दर्जाची १५०० मोहल्ला क्लिनिक उभी केली, महिला सुरक्षिततेचा प्रश्न योग्य पद्धतीने हाताळला, भ्रष्टाचारविरहित प्रशासन दिलं, नद्यांची स्वच्छता योग्य पद्धतीने केली अशा प्रकारची स्तुतीसुमने अरविंद केजरीवाल यांच्यावर उधळली जात आहेत.
भारतीय जनता पक्षातर्फे सुनील यादव यांना अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध तिकीट देण्यात आलं आहे. जगातील सगळ्यात मोठा पक्ष म्हणून मिरवणाऱ्या भाजपला दिल्ली निवडणूकीत आम आदमी पक्ष कशी टक्कर देणार हे पाहणं आता रंजक ठरणार आहे.