हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचे संकट पसरले आहे. अशातच महाराष्ट्रातील केळीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नवीन एका विषाणूचे सावट आले आहे. आधीच शेतकरी आर्थिक समस्यांचा सामना करत आहेत. कोरोनामुळे केळी लागवडीचे प्रमाणही कमी झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली आहे त्यांच्यावर नवेच संकट कुकुंबर मोझाक विषाणू (सीएमव्ही) याच्या रूपात आले आहे. त्यामुळे सध्या केळी उत्पादक चिंतेत सापडले आहेत. राज्यातील जळगाव जिल्ह्यातील रावेर भाग हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर तालुक्यातील केळीच्या ग्रीन बेल्टमध्ये हा व्हायरस आला आहे. यावर्षी पुन्हा या विषाणूने डोके वर काढल्याने केळीची रोपे उपटून फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या रोगामुळे केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.
टिश्यू कल्चर केळी रोपे जैन या जळगावातील प्रसिद्ध कंपनीचे असून या रोपांमध्ये कुठल्याही प्रकारची रोग प्रतिकारक शक्ती कंपनीने तयार केली नाही. यामुळे तीन वर्षांपासून हा रोग जास्त थैमान घालत आहेत. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानाला तोंड द्यावे लागत आहे. जुलै महिन्यात लागवड केलेल्या टिश्यू कल्चर रोपांवर या रोगाचे प्रमाण सर्वाधिक असून, जिल्ह्यातील किमान दोन हजार हेक्टर्स केळीवर हा रोग आला आहे. शेतकऱ्यांनी यातील किमान दोनशे हेक्टर्स केळी उपटून फेकण्यात आली आहेत. संततधार पावसाने आणि ढगाळ वातावरणामुळे या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. परंतु शेतकरी सांगतात की, टिश्यू कल्चर केळी रोपे जुलैत लागवड झाली असून याच रोपांवर हा रोग आला आहे.
कुकुंबर मोझाक रोग होत असताना, सुरुवातीस कोवळ्या पानांवर हरितद्रव्य विरहित, पिवळसर पट्टे दिसतात, पानावार १-२ अर्धवट आकाराचे किंवा पूर्ण पानभर पसरलेले पट्टे दिसतात.कालांतराने पानांचा पृष्ठभाग आकसला जाऊन कडा वाकड्या होतात.पाने आकाराने लहान होतात. शिरा ताठर होऊन संपूर्ण पान कडक होते. हाताने दाबल्यास कडकड आवाज येतो. नवीन येणारी पाने आकाराने लहान होतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास पोंग्याजवळील पान पिवळे पडून पोंगा सडतो.प्रादुर्भावग्रस्त झाडे पक्क अवस्थेपर्यंत टिकाव धरत नाहीत. झाडाची वाढ खुंटते झाडांची निसवण उशिरा अनियमित होऊ होऊन फण्या लहान होतात.
विषाणू जन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याच्या नियंत्रणासाठी ठोस उपाय योजना करता येत नाहीत. मात्र नियंत्रणासाठी गावपातळीवर एकत्रिरित्या मोहिम राबवल्यास रोग प्रसार रोखला जाऊ शकतो. प्रादुर्भावग्रस्त झाडे मुळांसहित उपटून दूर ठिकाणी जाळून किंवा गाडून टाकावीत. बागेचे सातत्याने निरीक्षण करावे. बाग तसेच बांधावरील सर्व प्रकारची तणे काढून स्वच्छता ठेवावी. बागेत काकडीवर्गीय तसेच टोमॉटो, मिरची, वांगी मका लागवड करन नये.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’