कोल्हापूर प्रतिनिधी | सतेज औंधकर
ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणात आज आणखी तीन आरोपींना 10 दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दाभोळकर हत्या प्रकरणातील संशयित सचिन अंदुरे, गौरी लंकेश हत्या प्रकरणातील दोन संशयित आरोपी गणेश मिस्कीन आणि सचिन बद्दी अशा तिघांचा यामध्ये समावेश आहे. या सुनावणीवेळी संशयित आरोपी सचिन अंदुरे याने तपासाधिकारी तिरुपती काकडे यांनी छळ केल्याचा धक्कादायक आरोप न्यायालया समोर केला.
‘मी सीबीआय कोठडीत असतानाही मध्यरात्री तीन वाजेपर्यंत माझा छळ केला’ असा दावा अंदुरे याने केला तर सरकारी वकिलांनी संशयितांचा या हत्येत सहभाग असून त्याच्या तपासासाठी १५ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली मात्र न्यायालयाने दहा दिवसांची पोलिस कोठडी दिली. दरम्यान सुनावणी झाल्यानंतर संशयित आरोपींना पोलिसांनी अज्ञात स्थळी हलवलं होतं, मात्र रिमांड चार्टवर आरोपींच्या सह्या राहिल्यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयात आणण्यात आले. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.