टीम HELLO महाराष्ट्र : मंदिराच्या घंटिजवळ मोबाईल अडकवून ते आजोबा मोबाईलची रिंगटोन वाजण्याची वाट पहात बसले होते. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या परिसारातून आम्ही भटकंती करत होतो. संपूर्ण गावात रेंज फक्त या इथेच येते. एखाद्याला कोणाला पुण्या – मुंबईत कामाला असणार्या त्याच्या पोराबाळांना फोन लावायचा असेल तर या मंदिराच्या घंटेजवळ येऊन पूर्वेकडच्या बाजुला तोंड करुन उभं रहावं लागतं. तसं उभ राहील्यावर मग थोड्या वेळाने मोबाईल नेटवर्क पकडतो. वाघावळे नावाच्या गावात तर तिथल्या शाळेच्या मागच्या साइडला एक मोठ्ठा दगड पाढर्या रंगाने रंगवलेला आहे. त्या दगडावर पूरवेकडच्या बाजुला तोंड करुन उभं राहून हातातला मोबाईल उंच धरला की रेंज येते. गावात इतरत्र कोठेही नेटवर्क नाही. कोयना डॅमच्या बॅक वाॅटरचा हा परिसर अतिदुर्गम भागात मोडतो. सरकारी अनास्थेपोटी सह्यद्रिचा हा पट्टा वीज, रस्ते, दवाखाना अशा मुलभूत सुखसोईंपासून आजही कोसो दूर आहे. इथल्या गावांमधे फेरफटका मारल्यावर समजतं की गावांमधे फक्त वृद्ध लोकंच रहातात. रोजगाराच्या कसल्याच संधी उपलब्ध नसल्याने आणि डोंगराळ माळरानांवरती केलेल्या शेतीत पूरेसे पीक येत नसल्याने अर्धवट झालेल्या शिक्षणाच्या आधारावर इथल्या तरुण पोरांनी पुण्या-मुंबईची वाट धरलेली आहे. तसे करण्याशिवाय त्यांना गत्यंतरच नसते. ९ वी – १० वी पर्यंतचेच शिक्षण झालेल्या यांच्या पदरी मात्र शहरात जावून हमाली करणे कींवा होटेलात वेटर म्हणुन काम करणे असलीच कामं पडतात. एखादा १२ वी वगैरे पास असेल तर त्याला कुण्या कंपणीत जाॅब मिळतो. पण पगार मात्र जेमतेम. त्यातनंच बचत करुन ही पोरं घराकडं पैसे पाठवतात. अन् अश्या पोस्टानं येणार्या पैस्यावरतीच इकडची गाव चालतात. सगळी तरणी पोरं कामानिमित्त बाहेर असल्याने या गावांमधे फक्त म्हातारि कोतारिच मागं उरतात.
कोयना धरणाची निर्मिती तशी १९६०-१९६२ ची.
कोयना धरण होण्यापूर्वी ही गाव खाली म्हणजे आत्ता धरणाचं पाणी आहे त्या पाण्यात होती. तीन-चार नद्याचा संगम असणार्या हा भाग तेव्हा नंदनवनच होता. पण या खोर्यात भिंत टाकून जर पाणी अडवलं तर त्यातुन अख्या महाराष्ट्राला पाणी पुरवठा होऊ शकतो अन् मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होऊ शकते हे लक्षात घेऊन सरकारने इथं धरण बांधण्याचं ठरवलं. आजुबाजूच्या सगळ्या गावांचं पुनर्वसन करण्यात आलं. कोणाला सातारा जिल्ह्यातच कोरेगाव भागात टाकण्यात आलं तर कोणाला पलुस च्या परिसरामधे हलवण्यात आले. काही गावांचं पुनर्वसन ठाणे जिल्ह्यात करण्यात आलं. महाराष्ट्राला पणी भेटावं, वीज भेटावी म्हणुन इथल्या लोकांनी त्यांच्या सुपीक जमिनी, गावं अन् देवळं पाण्याखाली घातलीत अन् सारा संसार गुडाळून आणि देव पाठीवर टाकुन ही लोकं सरकार जिथं पुनर्वसन करिल तिथं तिथं स्थलातरित झालीत. ही गोष्ट १९६२ ची. पण ज्यांना नवीन भाग पचला नाही, ज्यांना ते हवामान सोसलं नाही अशी काही लोकं पुनर्वसनानंतर सहा महीण्यानीच गावाकडच्या मातीच्या ओढीने माघारि आलीत अन् पाण्याची पातळी जिथं संपतेय त्याच्या वरच्या अंगाला, डोंगर माथ्याला खोपटी बांधुन राहू लागली. माघारि आलेल्या लोकांना सरकारने पर्यायी जमिनी दिल्या. सरकारने दिलेल्या माळराण जमिनीत ढेकरं फोडून राब राब राबून पोटापूरती शेती करुन तिरि मिरि करत ही लोकं जगू लागली. पण असं जिकरिचं जिवण जगणार्या या लोकांना सरकारकडून अद्याप पिण्याच्या पाण्याची सोय झालेली नाही. शेतीसाठी सुद्धा सिचनाची सोय नाही. सगळी शेती आभाळातनं पडणार्या बेभरवशी पाण्यावरच अवलंबून असते. कोयना धरणाच्या पश्चिमेच्या बाजुला वसलेल्या गावांची स्थिती तर फारच बिकट आहे. तिकडच्या गावांनी अजुन लाईट म्हणजे काय प्रकार असतो तेच पाहीलेले नाही. ज्याच्या जमिनी अन् गावा पाण्याखाली बुडवून कोयना धरण उभं राहिलं आज त्याच लोकांच्या खोपटांमधे त्या धरणामधुन तयार झालेली वीज पोहोचलेली नाही. धरण होऊन ५५ वर्ष झालीत पण या ५५ वर्षांत या गावांत वीज आली नाही. पलीकडच्या पश्चिमेच्या गावांमधे रस्ता नावाचा प्रकारच नाही. होडी हेच दळणवळनाचे प्रमुख साधन आहे. पूर्वेकडच्या बाजुला रस्ता आहे पण त्या रस्त्याने स्वातंत्र्यानंतरच्या या इतक्या वर्षांमधे डांबर पाहीलेले नाही. त्यामुळे पाऊसाळ्यात चिखल होऊन तो बिनकामी होतो. डांबरिकरण नसल्याकारणाने पूरवेकडच्या १-२ गावांत येणारी एस.टी. बस पावसाळ्यात ५ महिने बंदच असते. दळनवळणासाठी सरकारने काही लाॅज (मोटारिवरची बोट) ठेवल्या आहेत. पन त्या सुद्धा उन्हाळ्यात पाणी कमी झाल्यावर बंद होतात अनं पावसाळ्यात वाहत्या पाण्यामुळे बंद असतात. जिथं माणसाच्या डाॅक्टरची बोंबाबोंब आहे तिथे जनावरांसाठीचा डाॅक्टर असण्याचा प्रश्नच येत नाही. किरकोळ दुखापतीनेसुद्धा इकडं गुरं ढोरं मरुण जातात.
एखाद्याला साप वगैरे चावला तर त्याला चौघा जनांणी उचलायचा अन् पळवत ३० – ३५ की.मी. वर असलेल्या तापोळा ला न्ह्यायचा. जगला तर जगला न्हायतर मेला वाटतच. कोणी डिलिव्हरिची अडलेली बाई असली तर डालगं करायचं अन् दोघा – तिघांनी खांद्यावरनं धरणाच्या काठापर्यंत न्ह्यायाची अन् तिथनं होडीमधुन तापोळ्याच्या सरकारी इस्पितळात न्ह्यायाचं. तिथं बी काय न्हाय झालं तर सातार्याला पळवायचं.
“आरं आम्ही माणसं हाय जनावरं न्हाय.” असं ते मदिराच्या आवारात बसलेले आजोबा आम्हाला सांगत होते. “ती अॅम्ब्यूलन्स राहुदे मरुदे पण निदान एस.टी. बस तरि सरकारणं नियमित सुरु करुन द्यायला पाहीजेल का न्हाय? वाहन इथवर यत असल तर माणुस मरायचा तर न्हाय. कसतर करुन त्याला दवाखाण्यात तरि नेता येईल.”
“सरकारला काय भिक लागलीय का? मला हवं तर पकडून न्ह्या मी असं म्हणतूय म्हणुन. मी कोठीत बसायला तयार हाय.” असं म्हणतानाचा त्यांचा आवाज कठोर वाटत होता. सह्याद्रीतल्या खर्या घाटी माणसासारखा.
विडियो पहाण्यासठी खालील लिंकवर क्लिक करा