दिल्ली | दाऊदी बोहरा मुस्लिम समाजातील खतना या प्रथेवर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उभे केले आहे. खतना प्रथेविरोधातील याचिकेवर सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयाने ‘महिलांचा जन्म फक्त लग्नासाठी आणि पुरुषांच्या सुखासाठी नसतो’ असे म्हणुन खडे बोल सुनावले आहेत. खतना प्रथेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून सदर प्रथा बंद करण्यात यावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.
खतना प्रथेविरोधात बोहरा समाजातील महिला काही बोलण्यास बहुदा तयार होत नाहीत. विषय संवेदनशील आणि नाजूक असल्याने आजवर कोणीही यावर विशेष आवाज उठवला नव्हता. परंतु आता याच समाजातील महिलांनी एकत्र येऊन खतना प्रथेविरोधार आवाज उठवण्यास सुरवात केली आहे. आरिफा जोहरी नावाची एक तरुण पत्रकार याचे नेतृत्व करत असून आपल्या मोहीमेला त्यांनी सहीयो (मैत्रिण) असे नाव दिले आहे.
काय आहे खतना प्रथा ?
मुस्लिम समाजात ज्याप्रमाणे विशिष्ट वयात मुलांच्या गुप्तांगाचा भाग कापला जातो त्याचप्रमाणे दाऊदी बोहरा समाजात विशिष्ट वयात महिलांच्या गुप्तांगाचा भाग कापण्याची प्रथा आहे. या अनिष्ट प्रथेलाच खतना असे म्हटले जाते. साधारण सात – आठ वय झाले की दाऊदी बोहरा समाजात मुलींच्या जननांग कापले जाते. यावेळी त्या महिलांना प्रचंड त्रास होतो. काही वेळा काहीजणी यातून आजारी ही पडतात.