हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात सामना रंगणार आहे. पहिल्या सामन्यात मुंबईला पराभूत केल्यानंतर दुसर्या सामन्यात चेन्नईला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसरीकडे दिल्लीसाठी हा दुसरा सामना असेल. पहिल्या सामन्यात दिल्लीने पंजाबविरुद्ध सुपर ओव्हर मध्ये रोमांचक विजय मिळवला. त्यामुळे एकीकडे दिल्लीकडे युवा खेळाडूंचा उत्साह असेल तर दुसरीकडे चेन्नईकडे अनुभवी खेळाडूंचा ताफा. त्यामुळे आज रंगतदार सामना होण्याची शक्यता आहे.
चेन्नई संघाबद्दल बोलायचे झाले तर त्यांची संपुर्ण फलंदाजी फाफ डू प्लेसिसवर अवलंबून आहे. सोबतीला शेन वॉटसन असला तरी तो म्हणावा तसा फॉर्मात नाही. मागील सामन्यात त्यांच्या फिरकी गोलंदाजांची खराब कामगिरीमुळे चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. महेंद्रसिंग धोनी, मुरली विजय , रवींद्र जडेजा याना आज जबरदस्त खेळ करावा लागेल.
तर दुसरीकडे युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या दिल्ली संघात पृथ्वी शॉ, शिखर धवन, ऋषभ पंत, कॅप्टन श्रेयस अय्यर आणि शेवटच्या सामन्याचा नायक मार्कस स्टोइनिस सारखे मोठे हिटर आहेत. पण खांद्याच्या दुखापतीमुळे रविचंद्रन अश्विनच्या खेळण्यावर शंका आहे. अशा परिस्थितीत दिल्लीला त्यांच्या गोलंदाजांमध्ये काही बदल करावे लागतील. अश्विन जर खेळत नसेल तर अमित मिश्रासह अक्षर पटेलला साथ देण्यासाठी पर्याय असू शकतो.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’