#HappyMakarSankranti | देशाच्या कानाकोपऱ्यात मकर संक्रांतीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. विविध भागात हा सण वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. परंपरेनुसार मकर संक्रातीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांतीच्या मुहूर्त स्नान, दान आणि पुण्य यासाठी शुभ मानला जातो. जाणून घेऊयात मकर संक्रातीच्या परंपरेबाबतच्या काही खास गोष्टी…
१) सम्राट दिलीप यांचे पुत्र भगीरथ इक्ष्वाकुवंशीय यांनी घोर तपस्या करुन गंगा नदीला पृथ्वीवर अवतरले होते. मकर संक्रांती दिवशीच गंगा भगीरथच्या मागे जात कपिल मुनींच्या आश्रमातून समुद्राला मिळाली होती, अशी आख्यायिका आहे.
२) श्रीकृष्णाच्या प्राप्तीसाठी यशोदा माईने या दिवशीच व्रत केले होते, असा उल्लेख देखील पुराण कथांमध्ये आढळतो.
३) हजारो वर्षांपूर्वी मकर संक्राती ३१ डिसेंबरला साजरी केली जायची. सूर्याच्या अंदाजावर अवलंबून असणारा हा सण पुढील पाच हजार वर्षांत फेब्रुवारीमध्ये साजरा केला जाईल, असे भाकित देखील करण्यात आले आहे.
४) सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करण्याच्या वेळेला मकर संक्रात हा सण साजरा करण्यात येतो. २०१२ मध्ये १४ जानेवारीच्या मध्यरात्री सूर्याने मकर राशीत प्रवेश केला होता. त्यामुळे त्यावेळी मकर संक्रांती १५ जानेवारीला साजरी करण्यात आली होती.
५) महाराष्ट्रामध्ये ही या सणाला विशेष असे स्थान आहे. सूर्याचा आकार हा तिळा-तिळाने वाढतो असे मानले जाते. यादिवशी राज्यभरात ऐकमेकांना तिळगुळ देऊन हा उत्सव साजरा केला जातो. मकर संक्रांतीचा दिवस वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो.