डोकं चालवायला शिकवणाऱ्या ‘अंनिस’च्या ‘तिशी’निमित्ताने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाला ९ ऑगस्ट २०१९ रोजी ३० वर्ष पूर्ण होत आहेत. ६ वर्षांपूर्वी मारेकऱ्यांच्या भ्याड हल्ल्यात या चळवळीने आपला नेता गमावला. डॉ नरेंद्र दाभोलकरांच्या विचारांचा वारसा कृतिशीलपणे चालू ठेवत कार्यकर्त्यांनी हा लढा मागील ६ वर्षांत आणखी डोळसपणे पुढे नेला आहे. महाराष्ट्र सरकारकडून जादूटोणा विरोधी कायदा आणि सामाजिक बहिष्कार प्रतिबंध कायदा मंजूर करून घेण्यामध्ये ‘अंनिस’ने महत्त्वाची भूमिका बजावली. समितीला ३० वर्षे पूर्ण होत असताना विवेकवाद्यांची आंतरराष्ट्रीय परिषद मुंबईमध्ये पार पडत आहे. त्यानिमित्ताने वाघेश साळुंखे या सांगलीमधील कार्यकर्त्याने घेतलेला समितीच्या कार्याचा आढावा
          अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम अत्यावश्यक खरे. परंतु ते अवघड आहे हेही तितकेच खरे आहे. स्वतःच्या घरचे खाऊन लोकांच्या शिव्या खाण्याचे काम म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम असे या कामाचे वर्णन करता येईल. ज्यांच्या भल्यासाठी हे काम केले जाते त्यांनाच ते काम नको असते. आणि ज्यांच्या विरोधात हे काम जाते, ते तर काहीही करून हे काम थांबायलाच पाहिजे असा प्रयत्न करत असतात. त्यासाठी ते कोणताही मार्ग अवलंबायला तयार असतात. परंतु या कामाचे वैशिष्ट्य असे की ज्ञानाच्या प्रकाशात हळूहळू लोकांना याचे महत्व पटू लागते. पूर्वीच्या अंधश्रद्धा आता राहिल्या नाहीत याचे कारण हेच आहे. पूर्वी सती प्रथा बंद करण्यासाठी तीव्र विरोध झाला. परंतु आता ती प्रथा चुकीची होती हे समाज मान्य करतो. आज सती प्रथेविरोधात लढा दिलेल्या राजा राममोहन रॉय यांचे कौतुक केले जाते. पण त्या काळात त्यांना विरोधच सहन करावा लागला. म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाचे यश हे तात्काळ नाहीच. डॉ. दाभोलकर नेहमी म्हणायचे, ‘माझी लढाई दशकांची नाही तर शतकांची आहे.’ याचा अर्थ इतकाच की याचे यश तात्काळ नाहीच. शिव्याशाप, मारहाण आणि बंदुकीची गोळी मात्र तात्काळ मिळू शकते. इतका विरोध झेलून समर्पित भावनेने कामात सातत्य राखणे ही सोपी गोष्ट नाही. म्हणूनच अंनिसच्या कामाची ३० वर्षे पूर्ण होताहेत ही मोठी गोष्ट मानावी लागते. समाजातील केवळ बोटावर मोजता येतील इतक्या कृतीशील विवेकी लोकांच्या पाठबळावर हे काम चालू आहे. अल्प संसाधनांच्या आधारे चालू आहे. एकूण सगळीच परिस्थिती प्रतिकूल असताना या संघटनेने गेल्या ३० वर्षात महाराष्ट्राला जे दिलेले आहे ते अविश्वसनीय वाटावे असेच आहे.
        यंदा महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. या काळातील निम्मा कालावधी म.अंनिस महाराष्ट्रात काम करत आलेली आहे.  महाराष्ट्र राज्याची साठी आणि अंनिसची तिशी या वर्षात साजरी होत असताना अंनिस आपल्या ३० वर्षातील कामाचा लेखाजोखा मांडत आहे. तसेच भविष्यातील वाढ आणि विस्ताराच्या दृष्टीने ध्येयनिश्चिती करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अंनिस ९ ऑगस्ट (अंनिसचा स्थापना दिवस) रोजी मुंबईमध्ये ‘मानवतावादासाठी विवेकवाद’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद भरवत आहे. या परिषदेला जगभरातील मान्यवर विवेकवाद्यांना निमंत्रित केले आहे. याला जोडूनच १० व ११ ऑगस्ट रोजी संघटनेचे त्रिदशकपूर्ती अधिवेशन घेतले जात आहे. हा तीन दिवसांचा काळ म्हणजे महाराष्ट्रातील मोठ्या विचारमंथनाचा काळ आहे. ९ ऑगस्टच्या परिषदेसाठी जवळपास१५ ते २० देशांतील प्रमुख विवेकवादी व्यक्ती व संघटनांना निमंत्रित केले आहे. तसेच देशभरातील समविचारी व्यक्ती, संघटना, चळवळीच्या प्रतिनिधींनाही निमंत्रित केले आहे. सध्या जगभरातच धर्मांध शक्तींच्या मानवताद्रोही कारवाया वाढल्या आहेत. काही ठिकाणी तर देशातील सरकारेच या शक्तींना पोसत आहेत. याचा धोका सगळ्या जगालाच आहे. सगळ्या धर्मांचा इतिहास जगासमोर आहे. मानवजातीचे सर्वात जास्त नुकसान धार्मिक समजांनी केले आहे. सर्वात जास्त मनुष्यहानी धर्माच्या नावाखाली झाली आहे. दुष्काळ, पूर, भूकंप या नैसर्गिक आपत्तींपेक्षा जास्त मनुष्यहानी धर्माच्या नावाने झाली आहे. आणि हे संकट सध्या खूपच गहिरे झाले आहे. धर्मांध संघटनांचे बळ प्रचंड वाढले आहे. अनेक ठिकाणी तर सत्ताच त्यांच्या ताब्यात आहेत. तर काही ठिकाणी सत्ताधारी त्यांच्या ताब्यात आहेत. या पार्श्वभूमीवर जगभरातील विवेकवाद्यांची जबाबदारी वाढते. अमर्याद सत्ता हातात असलेल्या धर्मांधांचा मुकाबला करण्याची रणनीती विवेकवाद्यांना ठरवावी लागणार आहे. मानवता वाचवण्यासाठी हे करणे गरजेचेच आहे. या गरजेतूनच ९ ऑगस्टच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे विषयसूत्र ‘मानवतावादासाठी विवेकवाद’ असे ठेवले आहे. यातून जगभरातील विवेकवाद्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे विचारमंथन होईल अशी आशा बाळगण्यास हरकत नाही. या परिषदेच्या निमित्ताने अंनिसची नाळ जागतिक विवेकवादी संघटनांशी जुळण्यास मदत होईल. अंनिसचे काम जगभर पोचण्यास मदत होईल. जगाला ‘भारतीय कसावरील विवेकवादाची’ ओळख होईल. १० आणि ११ ऑगस्ट रोजी अंनिसचे अधिवेशन असणार आहे. हे अधिवेशन म्हणजे अंनिसचा आनंद सोहळा असणार आहे. यात प्रामुख्याने अंनिसची यशोगाथा असणार आहे. अंनिसने गेल्या ३० वर्षात महाराष्ट्राला काय दिले, महाराष्ट्राच्या जडणघडणीत अंनिसचे गेल्या तीस वर्षातील योगदान काय, या गोष्टींची चर्चा असणार आहे. त्याच बरोबर भविष्यवेध घेण्याचा प्रयत्नही असणार आहे.
          अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीचे यशापयश दोन-तीन दशकांच्या कालावधीतील वाटचालीवरून मोजणे चुकीचे आहे. परंतु  अंनिसने निर्विवादपणे यश म्हणता येईल अशा काही गोष्टी केवळ तीस वर्षांमध्ये प्राप्त केल्या आहेत. ज्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना झाली. त्यावेळी केवळ अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी एखादी चळवळ उभी करावी हेच अनेकांना मान्य नव्हते. अंधश्रद्धा हा या समाजासमोरील प्रश्न आहे आणि तो खूप गंभीर प्रश्न आहे, याची जाणीवच सामाजिक चळवळीत असणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना नव्हती. पण आज अंधश्रद्धा हा प्रश्न आहे आणि तो गंभीर आहे हे अनेकांना मान्य झाले आहे. हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तीस वर्षांच्या कामाचे यश आहे. अंनिस केवळ समस्या ओळखून थांबलेली नाही, तर ती समस्या सोडविण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न अंनिसने केला आहे. अंधश्रद्धेच्या कोणत्याही प्रकारचा प्रश्न असो, तो अंनिसकडे गेल्यानंतर सुटू शकतो असा विश्वास आज महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे. हा विश्वास म्हणजे अंनिसच्या तीस वर्षाच्या अथक कामाचे यश आहे. ज्यावेळी अंनिसची स्थापना झाली होती, त्या काळात अनेक भोंदू बाबा-बुवा आपल्या चमत्कारांची जाहिरात करायचे. चमत्कारांचा उघडपणे दावा करायचे. त्यासंबंधात पेपरबाजी करायचे. पण आज महाराष्ट्रामध्ये एकही बुवा-बाबा उघडपणे चमत्काराचा दावा करत नाही. हे अंनिसच्या कामाचे मोठे यश आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि अंनिस यांच्या १८ वर्षांच्या अथक प्रयत्नामुळे जादूटोणाविरोधी कायदा करणे  शासनाला भाग पडले. अशा स्वरूपाचा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. हा कायदा महाराष्ट्रातील इतर राज्यांना आणि जगभरातील इतर देशांना सुद्धा पथदर्शी ठरेल असा आहे. भारतातील इतर राज्यातील विवेकवादी चळवळींनी आपल्या राज्यातही असा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी अंनिस कडून मार्गदर्शन घेतले जात आहे. इतकेच नव्हे तर युगांडासारख्या देशातही असा कायदा बनवण्याबाबत अंनिसकडून मार्गदर्शन घेतले गेले. जादूटोणाविरोधी कायद्याबरोबरच अंनिसने सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा देखील करण्यास शासनाला भाग पाडले. अंनिसने राबवलेले अनेक उपक्रम आज शासन आणि समाजाने स्वीकारले आहेत. विसर्जित गणपती दान करा, सार्वजनिक पाणवठ्यामध्ये गणपती मूर्ती विसर्जित करू नका, अशी प्रबोधन मोहीम अंनिसने राबवली. सुरुवातीला याला तीव्र विरोध झाला. परंतु आज शासनानेच हा उपक्रम अंगीकारला आहे. दरवर्षी शासन महानगरपालिका, नगरपालिका यांना आदेश काढून गणपती विसर्जनासाठी वेगळी सुविधा करून गणपती मूर्तींचे दान घेण्याबाबत सूचना देते. याच पद्धतीने ‘फटाकेमुक्त दिवाळी’ हा अंनिसचा उपक्रम शासनाने स्वीकारला आहे. शासन स्तरावरून याबाबतचे प्रबोधनात्मक उपक्रम राबवले जातात. समाजानेही या उपक्रमांना बऱ्यापैकी साथ दिली आहे. अंनिसचे ठळक यश म्हणता येईल अशा या काही गोष्टी आहेत. याशिवाय अंनिसचे इतरही अनेक उपक्रम समाजासाठी उपकारक ठरणार आहेत. मानसमित्र, जोडीदाराची विवेकी निवड, छद्मविज्ञान विरोधी प्रबोधन, अध्यात्मिक बुवाबाजी विरुद्धचा लढा, वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या रुजवणूकीसाठी शाळा ते महाविद्यालयीन स्तरावरील प्रयत्न, संविधान बांधिलकी महोत्सव, जातपंचायतीला मूठमाती अभियान, फिरते नभांगण, सत्यशोधकी तसेच आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह, इत्यादी अनेक प्रकारचे उपक्रम व प्रबोधन कार्य समाजाला पुढे घेऊन जाणारे व उन्नत करणारे आहे. अंनिसचे एकूण काम आणि ते काम ज्या प्रतिकूल परिस्थितीत गेले ते पाहता, हे काम नोबेल पुरस्काराच्या तोडीचे आहे. या विधानात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही.
       महाराष्ट्रात रुजलेली ही संघटना आज देशपातळीवर मान्यता पावून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली तज्ज्ञता, कृतीशीलता यांच्या जोरावर योगदान देण्यास सज्ज होत आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी चमत्कार आणि बुवा-बाबांना आव्हान देत सुरू केलेली ही संघटना आज अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली विवेकवाद आणि मानवतावाद जपण्यासाठीची लढाई लढण्यासाठी सज्ज होत आहे. ही खरे तर सगळ्या महाराष्ट्राला अभिमान वाटावी अशी गोष्ट आहे.  फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राने यापुढील काळात या संघटनेला भरभरून सहकार्य करायला हवे. ही संघटना जास्तीत जास्त मजबूत करण्यासाठी योगदान द्यायला हवे. इतिहासातील सुधारकांचा गौरव करायचा आणि समकालीन सुधारकांची हेटाळणी आणि छळ करायचा हे आता थांबवायला हवे. आपल्या उज्वल भविष्यासाठी हे थांबवायला हवे. संत आणि समाजसुधारकांचा महाराष्ट्र हे करेल असा विश्वास वाटतो.
वाघेश साळुंखे
(8600365536)
(वाघेश हे प्राथमिक शिक्षक असून मागील १० वर्षांहून अधिक काळ ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी जोडलेले आहेत.)
99

Leave a Comment