गडचिरोली : पोलिसांसोबत झालेल्या चकमकीनंतर स्वत:चा जीव वाचवण्याकरिता नक्षलवाद्यांनी चक्क पेरमिली येथील सरकारी आश्रमशाळेचा आश्रय घेतला असल्याचे तपासातून समोर आले अाहे. दिनांक २२ एप्रिल रोजी अहेरी तालुक्यातील बोरियाच्या जंगल परिसरात पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक होवून २२ मोवोवादी ठार झाले. यावेळी बचावलेले मावोवादी अंधाराचा फायदा घेत जंगलात पसार झाले होते. चकमकीनंतर नक्षलविरोधी पथकाने बोरिया जंगल परिसरात शोधमोहीम केली. यादरम्यान सोमवारी पुन्हा पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक होवून ६ नक्षली ठार झाले. पोलिसांच्या तावडीतून जीव वाचवण्यासाठी चकमकीतून बचावलेल्या नक्षलवाद्यांनी चक्क सरकारी आश्रमशाळेचा आश्रय घेतल्याचे उघड झाले आहे.
नक्षलवाद्यांनी मुक्काम केलेल्या शाळेपासून अवघ्या काही पावलांवर पोलिस चौकी असूनसुद्दा पोलिसांना नक्षलींचा मागमूस न लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नक्षलवाद्यांच्या धाकाने घाबरलेल्या शिक्षकांनी त्या रात्री नक्षल्यांसाठी जेवणही बनवून दिल्याचे चौकशीत समोर आले आहे. विशेष म्हणजे रविवारच्या चकमकीमधे ठार झालेला पेरमिली दलम कमांडर साईनाथ व सोमवारच्या चकमकीमधे ठार झालेला अहेरी दलम कमांडर वासुदेव हे दोघेही याच माध्यमिक आश्रमशाळेत शिकले आहेत. पोलिसांना नक्षलींच्या हालचालींची माहीती मिळाली असती तर तिसरी चकमक होवून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता होती.