थरारक.. माथेफिरूने १० मिनिटात केली तिघांची हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | आपल्या मुलीवर वाईट नजर ठेवतो म्हणून मुलीच्या घरच्यांनी परिसरातील एका तरुणाला विचारणा केली होती. याचा राग मनात ठेवत संतप्त झालेल्या तरुणाने धारदार चाकूने अवघ्या 10 मिनिटात धारदार चाकूने वार करीत वृद्ध दाम्पत्यासह तिघांना संपविले. हे तिहेरी हत्याकांड चिकलठाणा येथील चौधरी कॉलॉनीत घडले चौधरी कॉलोनीत राहणाऱ्या ५५ वर्षीय दिनकर भिकाजी बोराडे, पत्नी कमळ दिनकर बोराडे, मुलगा भगवान दिनकर बोराडे असे हत्या करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तर अमोल बोर्डे असे हत्या करणाऱ्या माथेफिरुचे नाव आहे.

परिसरातील नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत भगवान तसेच आरोपी अमोल हे दोघेही मित्र होते,त्यामुळे अमोलचे भगवानच्या घरी नेहमी येणे-जाणे होते. आरोपी अमोलची भगवानच्या बहिणीवर वाईट नजर असल्याने, ही बाब भगवान आणि त्याच्या आई-वडिलांना कळाली. याबाबत बुधवारी दुपारी तिघांनी अमोलला खडसावून विचारणा केली. सोबतच यानंतर घरी न येण्यास सांगितले. त्यावरून त्यांच्यामध्ये बराच वेळ वाद झाला.

दरम्यान, झालेल्या वादातून संतप्त झालेल्या अमोल ने रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास भगवानचे घर गाठत घराचा दरवाजा आतून लावून घरातील तिघांना काही कळण्याच्या आतच तिघांना चाकूने भोसकले. अचानक झालेल्या हल्ल्यात तिघेही जागीच ठार झाले. तिघांचा मृत्यू झाल्याची खात्री करून आरोपी अमोलने धारदार चाकू कमरेला लावत घराबाहेर पडला. अमोलचे रक्ताने माखलेले कपडे पाहून काहीतरी अघटित घडलं असावं असा अंदाज शेजाऱ्यांना आला. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. काही क्षणात पोलिसांनी घटनास्थळी हजर होऊन आरोपीला अटक केली. सुदैवाने मृत भगवान ची बहीण व दोन मुले बाहेर गेल्यामुळे त्यांचा जीव वाचला. या हत्याकांड प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या हत्या करण्याच्या घटनेमागचा नेमका खरा हेतू काय होता याचा पोलीस तपास घेत आहेत. मात्र, या हत्याकांडाने आसपासचा परिसर हादरून गेला आहे.

Leave a Comment