बुलडाणा प्रतिनिधी| बुलडाणा जिल्ह्यातील धाड या गाव शिवारात कर्जबाजारीपणाला कंटाळून ४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आल्या आहेत. गेल्या २४ तासांच्या अवधीत शेतकऱ्यांच्या झालेल्या आत्महत्येमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. राज्यात एकीकडे निवडणुकीची रणधूमाळी सुरु झाली आहे. तेव्हा निवडणुकांवर लाखो रुपये खर्च केल्या जात असताना दुसरीकडे आर्थिक विवंचनेतून शेतकरी आत्महत्या करीत असल्याच चित्र सध्या जिल्हयात दिसत आहे.
गेल्या २४ तासामध्ये जामठी, म्हसला, कुलमखेड व दहीद येथील चार शेतकऱ्यांनी कर्ज व नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. यातील म्हसला येथील शेतकरी सतीश भोंडे यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, कुलमखेड येथील शेतकरी नामदेव कानडजे यांनी विषारी औषध प्राशन करुण आत्महत्या केली, जामठी येथील शेतकरी जुमान जाधव यांनी स्वत:च्या शेतामध्ये सागाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली तर दहीद येथील लक्ष्मण राऊत या शेतकऱ्यानं झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर, निसर्गाचा खेळ आणि दुष्काळाचे कधी ओले तर कधी कोरडे संकट यामुळ शेतकरी जेरीस आला असून, उत्पन्नात लागवडीच्या तुलनेत दिवसेंदिवस घट होत असल्यामुळ शेतकरी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग स्वीकारत आहेत. धाड परिसरात या शेतकऱ्यांनी अचानक आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.