बीड : हा गड भगवानबाबांनी निर्माण केला आहे, इथे गडापेक्षा कोणीही मोठे नाही, भगवानबाबापेक्षा कोणीही मोठे नाही. धर्मकारण वेगळे आणि राजकारण वेगळे. हीच माझी श्रद्धा आहे, अशा भावना राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत. कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी प्रथमच भगवान गडावर जाऊन भगवान बाबांचे दर्शन घेतले. त्यांच्या स्वागतासाठी गडावर जय्यत तयारी करण्यात आली होती. दर्शन घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
त्यांनी म्हंटले की, विरोधी पक्षनेता म्हणून गडावर दर्शनासाठी आलो होतो तेव्हा काही जणांनी माझ्या गाडीवर दगडफेक केली होती. पण आज मला इथे दर्शनाची संधी मिळाली, भगवान बाबांनी न्याय केला ! सामान्य जनतेची, गोरगरिबांची सेवा करण्याची शक्ती मला मिळो असा आशिर्वाद भगवान बाबाकडे मागितला.
भगवान गडाला मदत करण्याचे मुंडे यांचे आश्वासन
मुंडे यांनी म्हंटले की, या गडाचे आणि आमचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे एक अभूतपूर्व नाते आहे. आज गडावर मी एक पाईक म्हणून गेलो होतो. अनेकांनी मला बाबांपासून दूर नेण्याचे ठरवले होते मात्र आज बाबांनी न्याय केला. मठाधिपती शास्त्री महाराज यांनी मला न्याय मिळवून दिला. हे गड शक्तीपीठ आहे. गडाची, मठाची सेवा करणे ही आमची जबाबदारी आहे. न मागता गडाला आम्ही गोष्टी द्यायला हव्यात आणि ते मी येत्या काळात करणार आहे.