पुणे : मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून धुळे जिल्हातील साक्री तालुक्यात जमावाने पाच जणांना मारहाण केली होती. त्यामधे गोसावी समाजातील पाच जणांचा बळी गेला होता. मृत्यु झालेले पाचही जण भटक्या विमुक्त जमातीतील होते. त्यांच्या पोशाख आणि दिसण्यावरून ते मुलांची तस्करी करणारे असल्याच्या संशय आल्याने जमावाने त्यांना बेदम मारहाण केली होती. त्या घटनेचे पुण्यात पडसाद उमटले असून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर डवरी, गोसावी, वाल्मिकी समाजाच्या लोकांनी आज मोर्चा काढला. खुनींना तीव्र शिक्षा ठोठावून पीडितांना न्याय मिळवून दिला जावा अशी मागणी या मोर्चाद्वारे प्रशासनाकडे करण्यात आली आहे. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
राईनपाडा, धुळे येथील निरपराध भटके विमुक्त भारतीय नागरिकांच्या हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी भटके विमुक्त महिला अधिकार आंदोलन, भटके विमुक्त जाती जमाती मानव सेवा प्रतिष्ठान, सुराज्य सेना आदी समविचारी संघटना एकत्र आल्या आहेत. धुळे हत्याकांडाचे राज्यभर पडसाद उमटत असून समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांतून त्या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे.