कराची | पनामा पेपर लिक घोटाळ्यात अडकलेल्या नवाज शरीफ यांना मायदेशी येताच लाहोर विमानतळावर अटक केली जाणार आहे. त्यांच्या सोबत त्यांची मुलगी मरियम नवाज यांनाही अटक होणार असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकांची राळ उडाली असताना नवाज शरीफ यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न त्यांच्या विरोधकांकडून केला जात आहे.
पाकिस्तानी सैन्य दलाच्या इंटर-सर्विस पब्लिक रिलेशन चे डायरेक्टर जनरल आसिफ गफूर यांच्या वार्तालाबाला नवाज शरीफ यांनी लंडनमध्ये पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे. ‘निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही रणनिती केली जात आहे. मी सत्तेत असताना सैन्याची मुजोरी खपवून घेत नाही. त्यामुळे मला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी हा खेळ सुरु आहे’ असे शरिफ यांनी म्हटले आहे.
नवाज शरीफ उद्या दुपारी चारच्या सुमारास लाहोर विमानतळावर उतरताच त्यांना अटक करून हवाईमार्गाने रावळपिंडीला घेऊन जाण्याचा पाकिस्तान सरकारचा इरादा असल्याची चर्चा आहे. न्यायालयात शरिफ यांच्यावर खटला चालू आहे. उद्या अटक झाल्यानंतर नवाज शरीफ यांना रावळपिंडीलाच न्यायालयीन कोठडीत ठेवले जाणार आहे.