मुंबई | झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे निर्मित ‘नाळ’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यादरम्यान, बुधवारी या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. या चित्रपटात श्रीनिवास पोकळे या चिमुकल्याने ‘चैतन्य’ नावाच्या मुलाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच होताच, याला पुष्कळ प्रेक्षकांनी आपली पसंती दर्शविली आहे. हा चित्रपट १६ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
‘नाळ’ चित्रपटाच्या माध्यमातून नागराज मंजुळे निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला आहे. तसेच,‘सैराट’चे कॅमेरामन सुधाकर रेड्डी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटातील संवाद नागराज मंजुळे यांनी लिहिले आहेत.नागराजच्या प्रत्येक सिनेमात आपल्याला नवं कॅरेक्टर पाहायला मिळतं.
‘नाळ’ हा चित्रपट आठ वर्षांचा मस्तीखोर मुलगा ‘चैतन्य’वर आधारित आहेत. महाराष्ट्रातील दुर्गम भागात नदी किनारी वसलेल्या छोट्याशा गावात चैतन्य राहतो. या चित्रपटात चैतन्यच्या वडिलांची भूमिका नागराज मंजुळे यांनी साकारली आहे. तर चैतन्यचे भावनिक विश्व, त्याचा खोडकर स्वभाव आणि शेवटी अनपेक्षित वळण, असे या चित्रपटाचे कथानक असल्याचे ट्रेलरमधून दिसते.