दिल्ली : राज्याचा प्रशासकीय प्रमुख कोण यावरुन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपाल अनिल बायजाल याच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता. ‘दिल्लीच्या नायब राज्यपालांना स्वतंत्र अधिकार नाहीत’ असा निकाल देत आज सर्वोच्च न्यायालयाने नायब राज्यपालांना लोकांनी निवडूण दिलेल्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम करण्यास बजावले आहे. ‘प्रत्येक गोष्टीसाठी सरकारला राज्यपालांची परवानगी घेण्याची गरज नाही. नायब राज्यपालांना लोकनियुक्त सरकारच्या सल्ल्यानुसारच काम करावे लागेल’ असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल राज्यपालांसोबतच्या संघर्षात जिंकले असल्याचे बोलले जात आहे.