नाशिक : भारतीय लष्कराचे लढावू विमान तांत्रिक बिघाडामुळे नाशिकजवळील शिवारात कोसळून खाक झाले आहे. सुदैवाने दोन्ही वैमानिक अपघातातून बचावले आहेत. रशियन बनावटीचे सुखोई सु ३० हे लढावू विमान परिक्षण चाचणी दरम्यान पिंपळगाव बसवंत गावाजवळील वावी – तुशी परिसरातील शिवारात कोसळले. नाशिक पासून २५ कि.मी. अंतरावर सकाळी ११ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. गावकर्यांनी तात्काळ पोलीसांशी संपर्क साधल्याने अन्य हानि टळली. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार हिंदुस्तान अॅरोनोटिक्स कंपनीच्या नाशिक येथील कारखान्यामधे संबंधित विमानावर काम चालू होते. विमानाची परिक्षण चाचणी घेण्यासाठी वैमानिकांनी सुखोईतून उड्डान केले असता त्यांना विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे लक्षात आले. वैमानिकांनी समय-सुचकता दाखवत पॅराशुटच्या सहाय्याने चालू विमानातून उड्या घेतल्याने दोन्ही वैमानिकांचा जीव वाचला. पिंपळगाव येथील शिवारात विमान कोसळल्याची माहिती नाशिक परिसरात पसरता गावकर्यांनी विमान पाहण्यासाठी एकच गर्दी केली आहे. संरक्षन मंत्रालयाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून अधिक चौकशी सुरु आहे.