हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. भाजपाचे सर्वात जास्त काळ राहिलेले पंतप्रधान म्हणून मोदींनी विक्रम केला आहे. त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा विक्रम देखील मोडीत काढला आहे. तसेच, सर्वात जास्त काळापर्यंत पंतप्रधान पदावर असलेले गैरकाँग्रेसी नेते म्हणून देखील पंतप्रधान मोदी यांनी विक्रम केला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या अगोदर अटल बिहारी वाजपेयी हे सर्वात प्रदीर्घकाळ गैरकाँग्रेसी पंतप्रधान होते. तर, सलग २ हजार २५६ दिवस अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान पदावर होते. १९ मार्च १९९८ रोजी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान बनले होते. जे सलग २२ मे २००४ पर्यंत पंतप्रधान पदावर होते. त्यांचा पहिला कार्यकाळ १९ मार्च १९९८ ते १३ ऑक्टोबर १९९९ पर्यंत होता. तर दुसरा कार्यकाळ १३ ऑक्टोबर ते २२ मे २००४ पर्यंत होता.
तर, सध्या देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान असलेले नरेंद्र मोदी हे २ हजार २६० दिवसांपासून आजतागायत पंतप्रधान पदावर कायम आहेत. यामुळे सर्वात जास्त काळ पंतप्रधान पदावर राहिलले पहिले बिगरकाँग्रेसी व भाजपा नेता म्हणून त्यांच्या नावे विक्रम झाला आहे. नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ २६ मे २०१४ पासून सुरू झाला असून, तो अद्यापही सुरूच आहे.
स्वातंत्र्यानंतर १९४७ पासून ते २०२० पर्यंत देशाला १५ पंतप्रधान मिळाले आहेत. देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहण्याचा विक्रम आहे. ते ६ हजार १३० दिवस पंतप्रधान पदावर होते.
जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर इंदिरा गांधी यांच्या नावावर सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम आहे. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या इंदिरा गांधी ५ हजार ८२९ दिवस पंतप्रधान पदावर होत्या.