गुवाहाटी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (सीएए) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदू जीना आहेत अशा शब्दात गोगोई यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदी हे देखील धर्माच्या आधारे भारताचे विभाजन करणारे मोहम्मद अली जीना यांच्या द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताचे पालन करत आहेत, अशी घणाघाती टीका गोगोईंनी केली.
गोगोई यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरून विद्यापीठ हिंसाचारावरही भाष्य केले आहे. पंतप्रधान मोदी आमच्यावर आरोप करतात की, आम्ही (काँग्रेस) पाकिस्तानची भाषा बोलतो. मात्र, त्यांनी स्वत:लाच पाकिस्तानच्या स्तरावर आणून ठेवले आहे. मोदी हे मोहम्मद अली जीना यांच्या द्विराष्ट्रवादाकडे सरकत आहेत. ते आता भारताचे हिंदू जीना म्हणून पुढे येत आहेत, अशा शब्दात गोगोई यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.