परभणी प्रतिनिधी । मागील एक आठवडयापासुन परतीचा पाऊस सुट्टी घेत नसून सतत पडणाऱ्या पावसाने खरिपातील पिकांना धोका निर्माण झाला आहे. या पावसामुळे जमीन वाफशावर येत नसल्याने पिके पिवळे पडण्यास सुरुवात झाली आहेत. त्यामुळे बळीराजाच्या हाताशी आलेला खरीप हंगाम धोक्यात आला आहे. परभणीत विजेच्या कडकडाटासह धो -धो पाऊस कोसळत आहे. आठवडाभरात सहा महसुल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. तर मंगळवार २४ सप्टेबर रोजी कोसळलेल्या पावसाची जिल्हयातील हादगाव मंडळ आणि पालम या दोन महसुली मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यात हादगाव मंडळात ८६ मिमी तर पालम मंडळात ६६ मिमी पाऊस झाला आहे. बुधवार २५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्हयातील ३९ मंडळात मिळून सरासरी १५.२५ मि.मी. झाला आहे. १ जुन ते २५ सप्टेंबर पर्यंत ५६२ मिमी पावसाची नोंद झाली असून सरासरीच्या ७२ टक्के पाऊस झाला आहे. परती
दरम्यान अल्पावधीत मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेत शिवरामध्ये पाणी साठवून राहत आहे. पिकांमध्ये वाफसा होत नसल्याने काढणीस आलेले सोयाबीन पीक धोक्यात आलं आहे. तर कापसामध्ये ओंबळण्याचे प्रमाण वाढले असुन पाते आणि फुले गळीचे प्रमाणही वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत. तुर पिकालाही याचा फटका बसणार असून ओंबळण्याचे प्रकार वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत. जिल्ह्यात सरासरीच्या 72 टक्के पाऊस पडला असला तरी जमिनीतील पाणी पातळी वाढण्यासाठी आणखी पावसाची गरज आहे. या सोबतच जिल्ह्यातील गोदावरी वरील उच्च पातळीबंधारे सोडले तर सर्वच लघु आणि मध्यम प्रकल्प कोरडे आहेत.
तोंडावर आलेल्या रब्बी हंगामासाठी हा पाऊस पोषक असून मागील वर्षी रब्बी हंगामापुर्वी परतीच्या पावसाने धोका दिला होता. त्यामुळे ज्वारी, हरभरा, करडई पिक पेरण्या बऱ्याच भागात होऊ शकल्या नव्हत्या. यावर्षी मात्र रब्बीला पोषक वातावरण असल्याने पेरणी क्षेत्र वाढणार आहे. याबाबत शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. दरम्यान आणखीन काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची चिन्हे असून खरीप हंगामासाठी बळीराजा चिंतातुर आहे.