पाकिस्तानकडून गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र | पाकिस्तानने आज सकाळी गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी केली. २९० किलोमीटरपर्यंत या क्षेपणास्त्राची मारक क्षमता आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हे क्षेपणास्त्र विकसित करणाऱ्या टीमचे अभिनंदन केले आहे. गझनवी क्षेपणास्त्राच्या चाचणीमागे भारतावर दबाव टाकण्याचा तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेण्याच्या पाकिस्तानचा हेतू असू शकतो.

या क्षेपणास्त्र चाचणीसाठी पाकिस्तानने कराची शहरातील हवाई क्षेत्राचा काही भाग ३१ ऑगस्ट पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने या चाचणीआधी नोटॅम जारी केला होता. पाकिस्तानने कराची हवाई क्षेत्रातील तिन्ही मार्गांवरुन हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. नोटॅमच्या नोटीसमध्ये आंतरराष्ट्रीय विमानांना कराची हवाई हद्दीतील तीन मार्गांवरुन विमान वाहतूक टाळण्याचे निर्देश दिले आहेत. पर्यायी मार्गही सुचवण्यात आले आहेत.

इम्रान खान सरकार भारतीय विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द पूर्णपणे बंद करण्याचा विचार करत आहे असे पाकिस्तानचे तंत्रज्ञान मंत्री फवाद हुसैन चौधरी यांनी म्हटले आहे. भारताने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यापासून दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. पाकिस्तानकडून सातत्याने युद्धाचे इशारे दिले जात आहेत.

भारताने २६ फेब्रुवारीला बालाकोटमध्ये एअरस्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद केली होती. पण त्यात पाकिस्तानचे दुप्पट आर्थिक नुकसान होत असल्यामुळे पाकिस्तानने हवाई हद्द पुन्हा खुली केली. आता इम्रान खान यांच्यावर विरोधक तुटून पडले आहेत. काश्मीर सोडा पीओके वाचवा असा सल्ला विरोधकांनी त्यांना दिला आहे.