पुणे : भिमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील प्रमुख साक्षीदार पुजा सुरेश सकट या १७ वर्षाच्या मुलीचा घराजवळील विहीरीमधे मृतदेह आढळून आल्याने भिमा कोरेगाव आणि परिसरामधे एकच खळबळ उडाली आहे. पुजा मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होती. वाडा पुनर्वसन येथील विहिरीमधे तिचा मृतदेह सापडल्याने कुटुंबियांवर शोककळा पसरली. १ जानेवारी २०१८ रोजी भिमा कोरेगाव येथे झालेल्या दलित आणि हिंदुत्ववादी गटांमधील हिंसाचार प्रकरणामधे पुजा फिर्यादी होती. पुजाचा मृत्यु हा घातपातामधून झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून तिच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेवून चौकशीची मागणी केली आहे.
यापूर्वीही एकमेव साक्षीदार असलेल्या पुजाच्या कुटुंबियांनी पुजाला आणि कुटुंबियांना अज्ञातांकडून धमक्या येत असल्याची तक्रार केली होती. पुजाच्या संशयीत मृत्युच्या पार्श्वभुमीवर पूजा हिच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अॅड. सुधीर ढमढेरे, विलास श्रीधर वेदपाठक, गणेश विलास वेदपाठक, नवनाथ ज्ञानोबा दरेकर, सोमनाथ फक्कड दरेकर, विलास काळुराम दरेकर, सुभाष गणपत घावटे, गोरक्ष पाटीलबुवा थोरात, गणेश गोरक्ष थोरात या ८ जणांच्याविरुद्ध शिक्रापूर पोलिस ठाण्यात आत्महत्तेस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.