प्रतिनिधी कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यातील पूर जरी ओसरला असला तरी नागरिकांना पुरानंतरच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातूनच ”पूरग्रस्तांनी गावामधील आपल्या पडझड झालेल्या धोकादायक घरांमध्ये राहू नये. प्रशासनामार्फत त्यांची राहण्याची सोय करण्यात येईल ” असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
डॉ. म्हैसेकर यावेळी म्हणाले,”पूरग्रस्तांना रोख रक्कम 5 हजार या प्रमाणे आज अखेर 17 कोटी 26 लाख रुपयांचे वाटप झाले आहे. 201 टन तांदुळ, गहू यांचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे मयत झालेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. सध्या पंचनामे सुरु असून पूर्णत: पडलेली घरे, अंशत: पडलेली घरे यांचा पंचनाम्यात समावेश आहे. गावकऱ्यांनी धोकादायक घरांमध्ये नागरिकांनी राहू नये.” असे आवाहन म्हैसेकर यांनी नागरिकांना केले. प्रशासनामार्फत त्यांची निवाऱ्याची सोय करण्यात येईल. अशा धोकादायक घरांमध्ये राहिल्यास प्रसंगी बळाचा वापर करुन त्यांना बाहेर काढण्यात येईल. पाणी पुरवठा योजना आठवड्याभरात सुरु करण्यात येणार असून तोपर्यंत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येईल. उद्या दुपारपर्यंत शेती वगळता वीज पुरवठा सुरु करण्यात येणार आहे. सध्या कोल्हापूर शहरात 62 टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे.”
जिल्ह्यात 442 एटीएम सेंटर सुरु करण्यात आली आहेत. उर्वरित एटीएम तीन दिवसात सुरु होतील. बंद बसणारे एसटीचे 31 मार्ग सुरु झाले आहेत. लवकरच सामान्य परिस्थिती आणण्यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. दिवसातून दोन वेळा साफसफाई करण्याच्या सूचना महापालिकेला देण्यात आल्या आहेत. सांगली आणि कोल्हापूरसाठी प्रत्येकी 25 कोटींचा निधी देण्यात आला आहे. काल अतिरिक्त पुन्हा प्रत्येकी 10 कोटी रुपये देण्यात आले आहेत. सांगली, कोल्हापूर दोन्ही जिल्ह्यासाठी मनुष्यबळ, साधनांची कमतरता कमी पडू देणार नाही. अशी माहिती आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी दिली.
स्वस्त धान्य दुकानदारांकडे तसेच तहसिल कार्यालयात असणाऱ्या नोंदीनुसार पूरग्रस्तांना मदत दिली जाईल. कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना वही, कंपास बॉक्स, दप्तराचे किट वाटप करण्यात येत आहे. बालभारती विद्यार्थ्यांना पुस्तके पुरवणार आहे. पूरग्रस्तांच्या नावावर मदत करण्याचे अनाधिकृत आवाहन कोणी करत असेल तर हा गुन्हा असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल”असा इशाराही म्हैसेकर यांनी यावेळी दिला. या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पी.बी.पाटील आदी उपस्थित होते.