अमरावती, प्रतिनिधी, आशिष गवई : व्यवसायात सातत्य आणि नावीन्य ठेवल्यास व्यवसाय वाढायला वेळ लागत नाही. प्रमोदभाऊंचा चहाचा व्यवसाय हा याचे उत्तम उदाहरणच म्हणावे लागेल. प्रमोद कांबळी असे या चहा विक्रेत्याचे नाव असून पंचक्रोशीत ते प्रमोदभाऊ म्हणून ओळखले जातात. अमरावती जिल्ह्यातील धामणगावात असणाऱ्या प्रमोदभाऊंच्या चहाची ख्याती दूरवर पसरली आहे. त्यांनी बनवलेला चुलीवरचा चहा पिण्यासाठी नागरिक दूरवरून येतात. धामणगाव रेल्वेस्टेशनजवळ त्यांचे दुकान आहे. रेल्वे फाटक जवळ असल्याने रेल्वे कर्मचारी सुद्धा चहाची चव आवर्जून घ्यायला येतात. शहरातील व्यापारी वर्ग सुद्धा सकाळी प्रमोदभाऊचा चहा घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवात करीत नाही. धामणगाव परिसरातील अनेकांच्या दिवसाची सुरवात प्रमोदभाऊंच्या चहानेच होते.
शहराच्या मध्यवस्तीत रेल्वे फटकाजवळ १५ वर्षांपूर्वी प्रमोदभाऊंनी पडकी झोपडी टाकून चहाचा व्यवसाय सुरु केला आणि बघता बघता व्यवसाय वाढत गेला. सकाळी ५ वाजता सुरू केलेली विक्री सायंकाळी ७ वाजेपर्यंत होऊ लागली. नागरिकांना दर्जेदार चहा देण्यासोबतच कमी भांडवलात उत्तम व्यवसाय कसा करायचा याचे आदर्श उदाहरण प्रमोदभाऊंनी घालून दिले आहे. सरकारी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा थोड्याश्या कौशल्याचे मदतीने व्यवसायात सातत्य ठेवल्यास व्यवसायातून चांगला नफा मिळू शकतो, हे प्रमोदभाऊंनी सिद्ध केले आहे.