अमरावती : राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काल पाहिल्याच दिवशी दर्यापूर तहसील कार्याला भेट देत सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी न केल्याचा ठपका ठेवत दोन तहसीलदारांवर निलंबनाच्या कारवाईचे आदेश दिले होते. नायब तहसीलदार पुरवठा निरीक्षक प्रमोद काळे आणि सपना भोवते यांच्यावर ही कारवाई केली होती. बच्चू कडू यांच्या या निर्णयानंतर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलेली कारवाई ही एकतर्फी असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे.
बच्चू कडू यांनी केलेली ही कारवाई चुकीच्या पद्धतीची आहे, अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण देण्यासाठी वेळ देण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे म्हणणेही ऐकून घेतले नाही. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एकतर्फी कारवाई केली असल्याचं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं आहे. तसेच, अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिले.