औरंगाबाद | १९९२ साली अयोध्येत शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पडल्याप्रकरणी चंद्रकांत खैरे यांना समन्स पाठवण्यात आले आहे. लखनौ येथील विशेष न्यायालयाने शिवसेना नेते तथा खासदार चंद्रकांत खैरे यांना सीबीआयच्या वतीने समन्स पाठविले आहे. या समन्सनुसार खैरे यांना येत्या २८ नोव्हेंबर रोजी न्यायालयात साक्ष देण्यासाठी हजर रहावे लागणार आहे.
1993 च्या अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमी प्रकरणात पवनकुमार पांडे व इतरांवर निश्चित केलेल्या आरोपांसंदर्भात साक्षीदार म्हणून तत्कालीन शिवसेना आमदार चंद्रकांत खैरे यांना सीबीआयने घटनास्थळावरून ताब्यात घेतले होते. त्यानंतर 1993 पासून सुरू असलेल्या खटल्यात महाराष्ट्रासह हिंदुस्थानातील अनेक शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या प्रकरणी येत्या 28 नोव्हेंबर रोजी श्रीराम जन्मभूमी अयोध्या प्रकरणाची लखनौ येथील विशेष न्यायालयात खासदार खैरे यांच्या साक्षीसाठी सुनावणी होणार आहे. या प्रकरणात कलम 120बी, 147, 149, 395, 397, 332, 338 क भा.दं.कि. 197/92, 98/92 आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणी सध्या अयोध्येत असलेले शिवसेना नेते, खासदार चंद्रकांत खैरे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानंतर लाखो शिवसैनिकांनी बाबरी मशिदीचा ढाचा पाडला होता. तेव्हा जाहीर कार्यक्रमात शिवसेनाप्रमुखांनी ‘मला माझ्या शिवसैनिकांचा अभिमान असल्याचे’ सांगितले होते. त्यांनी केलेले वक्तव्य हे शिवसैनिकांसाठी मोठी शाबासकीच आहे.