मुंबई प्रतिनिधी | ‘स्त्री’सारखा उत्तम विनोदी भयपट दिल्यानंतर लगोलग ‘बाला’सारखा पुन्हा एकदा रंजक आणि तितकीच अचूक मांडणी करणारा ‘बाला’ हा चित्रपट अमर कौशिक यांनी दिला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, आयुषमान खुरानाची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने दोन दिवसांत २५.८८ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
प्रदर्शनाच्या दिवशी ‘बाला’ने १०.१५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला तर शनिवारी १५.७३ कोटी रुपयांची कमाई झाली. आठवड्याअखेर या कमाईत चांगली वाढ होणार असल्याची शक्यता तरण आदर्शने वर्तवली आहे. शाळकरी वयापासून केस उडवत हिरोप्रमाणेच टेचात वावरलेल्या मुलाचे ऐन तारुण्यात केसगळतीच्या समस्येला सामोरे जावे लागते, हा कथाविषय असलेला ‘बाला’ हा चित्रपट तिकीटबारीवर चांगली कामगिरी करतोय.
बाला नामक तरुणाच्या गोष्टीतून चित्रपटाची मांडणी करत असताना अचानक आलेल्या या न्यूनत्वातून जाणाऱ्या माणसाची कथा-व्यथा मांडून दिग्दर्शक शांत बसलेला नाही. एकूणच आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक छोटय़ा-मोठय़ा घटनांचे टिक टॉक करत करत लाइक्समागे पळणाऱ्या तरुणाईची मानसिकता दिग्दर्शकाने यात अचूक पकडली आहे. त्यामुळेच हा चित्रपट केवळ अचानक टक्कल पडलेल्या तरुणाच्या गोष्टीपुरता मर्यादित राहत नाही. तो अनेक विषयांना स्पर्श करत पुढे जातो. म्हणूनच हा चित्रपट तरुणाईला आकर्षित करतोय.